बुधवार, १० सप्टेंबर रोजी भारतीय टेक्सटाइल कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. वेल्सपन लिव्हिंग लिमिटेड, गोकलदास एक्सपोर्ट्स लिमिटेड, वर्धमान टेक्सटाईल्स लिमिटेड, पर्ल ग्लोबल लिमिटेड, आलोक इंडस्ट्रीज आणि ट्रायडंट लिमिटेड यांच्या शेअर्समध्ये ९% पर्यंत वाढ झाली. शेअर्समध्ये वाढ होण्याचं कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडिया पोस्ट.
ट्रेड डीलच्या आशेनं बाजारात उत्साह
कामकाजादरम्यान वेल्स्पन लिव्हिंगचे शेअर्स ९% पेक्षा जास्त वाढीसह व्यवहार करत होते, तर गोकलदास एक्सपोर्ट्स आणि ट्रायडंटचे शेअर्स ७% पेक्षा जास्त वाढीसह व्यापार करत होते. पर्ल ग्लोबल आणि वर्धमान टेक्सटाईल्सचे शेअर्स देखील ५% ते ६% नं वधारले. भारत आणि अमेरिका यांच्यातील ट्रेड डीलबद्दल आशा वाढल्या असल्यानं ही वाढ झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सकाळी ट्रुथ सोशलवर दोन्ही देशांमधील चर्चा सुरू आहेत आणि ते त्यांचे चांगले मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्यास उत्सुक असल्याचं म्हटलं.
मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार
भारत-अमेरिका ट्रेड डीलवर चर्चा अडकली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलं की भारत आणि अमेरिका हे जवळचे आणि नैसर्गिक मित्र आहेत आणि ते देखील अमेरिकन राष्ट्राध्यक्षांशी बोलण्यास उत्सुक आहेत. तथापि, दोन्ही देशांमधील प्रस्तावित व्यापार करार सध्या अडकला आहे कारण अमेरिकेनं रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी भारताच्या निर्यातीवर अतिरिक्त २५% कर लादला आहे, ज्यामुळे एकूण कर ५०% झालाय. GTRI च्या आकडेवारीनुसार, या हालचालीमुळे भारताच्या सुमारे ६६% निर्यातीवर परिणाम होऊ शकतो, प्रामुख्याने टेक्सटाईल, सीफूड आणि रत्ने आणि ज्वेलरी सेक्टरवर याचा मोठा परिणाम दिसू शकतो.
स्टॉकची स्थिती
गेल्या एका महिन्यात टेक्सटाइल स्टॉक १५% ते २०% पर्यंत घसरले होते, परंतु बुधवारी त्यांना मजबूती दिसली. वेल्सपन लिव्हिंगचे शेअर्स ९% वाढून ₹१२४.५५ वर, गोकलदास एक्सपोर्ट्स लिमिटेडचे शेअर्स ७.३% वाढून ₹८०२.१५ वर, इंडो काउंट इंडस्ट्रीजचे शेअर्स ६.७% आणि ट्रायडेंट लिमिटेडचे शेअर्स ४% पेक्षा जास्त वधारले.
(टीप - यामध्ये केवळ शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)