Trump Tariffs : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर सातत्याने आर्थिक दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. २५ टक्के टॅरिफनंतरही भारताने माघार घेण्यास नकार दिल्याने आता अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. हा नवीन कर बुधवारी जाहीर करण्यात आला असून तो २७ ऑगस्टपासून (आजपासून २१ दिवसांनी) लागू होईल. या निर्णयामुळे अनेक भारतीय उत्पादनांवरील एकूण कर ५० टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. पण, महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी याला संधी म्हटले आहे.
भारतावर दबाव, तरीही संधी?
एकीकडे ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतावर मोठा दबाव येत असताना, दुसरीकडे भारतीय उद्योग जगतातून काही वेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या मते, ही परिस्थिती भारतासाठी दीर्घकालीन संधी म्हणून पाहिली पाहिजे. त्यांनी म्हटले आहे की, असे अनपेक्षित बदल भविष्यात भारतासाठी फायदेशीर ठरू शकतात, जसे की १९९१ च्या परकीय चलन संकटाने आर्थिक उदारीकरणाचा मार्ग मोकळा केला होता.
जागतिक बदलांची उदाहरणे
आनंद महिंद्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये जागतिक बदलांची काही उदाहरणे दिली.
- फ्रान्स आणि जर्मनी यांसारख्या देशांनी आपला संरक्षण खर्च वाढवला आहे.
- जर्मनीने त्यांच्या कठोर आर्थिक धोरणांमध्ये शिथिलता आणली आहे, ज्यामुळे युरोपच्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये पुनरुज्जीवन शक्य आहे आणि हा प्रदेश जागतिक विकासाचे एक नवीन इंजिन बनू शकतो.
- कॅनडा त्यांच्या प्रांतांमधील अंतर्गत व्यापार अडथळ्यांशी झुंजत होता, पण आता जागतिक आर्थिक बदलांमुळे ते हे अडथळे दूर करण्यासाठी ठोस पावले उचलत आहे, ज्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होऊ शकते.
भारतासाठी आनंद महिंद्रांचे महत्त्वाचे सल्ले
या 'जागतिक मंथनातून' भारत 'अमृत' (फायदे) कसे मिळवू शकतो, यासाठी आनंद महिंद्रांनी दोन प्रमुख क्षेत्रांकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी केली आहे.
१. व्यवसाय सुलभ करणे
भारताने आता एक खरी 'एकल खिडकी प्रणाली' स्थापित करावी. याचा अर्थ, गुंतवणूकदारांना हळूहळू सुधारणा करण्याऐवजी एकाच व्यासपीठावर सर्व गुंतवणूक परवानग्या मिळतील.
काही राज्ये एकत्र येऊन एक समान व्यासपीठ तयार करू शकतात, जे गुंतवणूकदारांना गती, पारदर्शकता आणि विश्वास प्रदान करेल.
२. पर्यटनाला प्रोत्साहन देणे
पर्यटन हे भारतातील सर्वात कमी वापरले जाणारे परकीय चलन आणि रोजगार निर्मिती क्षमता असलेले क्षेत्र आहे. याला चालना देणे महत्त्वाचे आहे.
याशिवाय, त्यांनी एमएसएमई क्षेत्राला तरलता आणि पाठिंबा देणे, पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देणे आणि पीएलआय योजनांद्वारे उत्पादनाला प्रोत्साहन देणे यावरही भर दिला.
वाचा - जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
ट्रम्प यांच्या निर्णयामुळे तात्पुरता दबाव असला तरी, आनंद महिंद्रांसारखे व्यावसायिक नेते याला भारताच्या आर्थिक सुधारणांसाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी एक संधी म्हणून पाहत आहेत.