वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा भारतावर निशाणा साधला. ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडिया पोस्टद्वारे आरोप केला की, भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करत असून, त्यातील बरेचसे तेल नफा कमावण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात विकत आहे. यामुळे भारताला युक्रेनमध्ये रशियाने चालवलेल्या युद्धात मृत्युमुखी पडलेल्यांची पर्वा नसल्याचे स्पष्ट होते. रशियाला मदत करणारी ही कृती पाहता मी भारतावरील टॅरिफमध्ये आणखी वाढ करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.
ट्रम्प यांनी याआधी रशियाकडून कच्च्या तेलासह लष्करी साहित्याची खरेदी केल्याने भारतातून अमेरिकेला निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर २५% टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती.
मी पाच युद्धे थांबविली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
भारत आणि पाकिस्तानसह जगभरातील पाच युद्धे मी थांबविली. थांबविलेल्या युद्धात काँगो प्रजासत्ताक आणि रवांडा यांच्यातील ३१ वर्षांच्या रक्तरंजित संघर्षाचा समावेश आहे, असे ट्रम्प म्हणाले. भारत व पाकिस्तान युद्ध मी थांबविले, असे ट्रम्प आतापर्यंत ३३ वेळा म्हणाले आहेत.
टॅरिफचा फटका तात्पुरता की दीर्घकाळ?
अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफची अंमलबजावणी केल्यास भारताच्या निर्यातीवर दरवर्षी १.३ लाख कोटी ते १.५ लाख कोटी रुपयांचा परिणाम होऊ शकतो. २०२४-२५ मध्ये भारताने अमेरिकेला ७.१८ लाख कोटी रुपयांची निर्यात केली होती.
अर्थतज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांनी लावलेले टॅरिफ तात्पुरत्या स्वरूपातील अडचणी निर्माण करू शकतात, पण भारताची दीर्घकालीन स्पर्धात्मकता अबाधित राहील. भारताकडे कुशल, शिक्षित आणि स्वस्त मनुष्यबळ आहे.
विशेषतः “चीन प्लस वन” धोरणांतर्गत भारत हा प्रमुख पर्याय आहे. तज्ज्ञांनी भारताला निर्यातीसाठी पर्यायी बाजारपेठांचा शोध, ग्लोबल साउथशी सहकार्य आणि प्रमुख ३२ देशांशी व्यापार संबंध मजबूतीचा सल्ला दिला आहे. सेवा निर्यातीत भारत अजूनही सक्षम असून यामुळे टॅरिफचा तोल राखला जाऊ शकेल, असे नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंटने म्हटले आहे.