Elon Musk-Donald Trump : अमेरिकेचे राजकारण आणि तंत्रज्ञान जगातील दोन मोठे चेहरे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क, यांच्यातील संबंधात सुधारणा झाल्याची चिन्हे दिसत आहेत. एकेकाळी 'जय-विरूची जोडी' म्हणून ओळखले जाणारे हे दोघे गेल्या काही दिवसांपासून काही मुद्द्यांवरून एकमेकांवर टीका करत होते. आता मात्र, मस्क यांनी ट्रम्प यांची माफी मागितली आहे. यानंतर मस्क यांच्या एकूण संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे!
मस्क यांची माफी आणि संपत्तीतील वाढ
फोर्ब्सच्या 'रिअल-टाइम बिलियनेअर रँकिंग'नुसार, इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती १९१ दशलक्ष डॉलर्सवरून ४११.४ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. मस्क यांनी बुधवारी रात्री 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट करत म्हटले की, "गेल्या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील माझ्या काही पोस्टबद्दल मला खंत वाटते. गोष्टी खूप पुढे गेल्या."
'न्यू यॉर्क टाईम्स'मधील वृत्तानुसार, गेल्या शुक्रवारी इलॉन मस्क यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ सुझी विल्स यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेत दोघांमधील मतभेद मिटवून सलोखा साधण्यावर भर देण्यात आला.
ट्रम्प यांनी माफी स्वीकारली
या घडामोडींनंतर, माध्यमांशी बोलताना प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, ट्रम्प यांनी मस्क यांची माफी स्वीकारली असून त्यांनी मस्क यांचे कौतुक केले. प्रेस सेक्रेटरी म्हणाल्या की, "आम्ही अमेरिकेतील लोकांच्या कामावर आणि व्यवसायावर लक्ष केंद्रित करत राहू." या प्रतिक्रियेवरून दोघांमधील संबंध सुधारल्याचे स्पष्ट होत आहे.
वादाचे कारण काय होते?
ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा ट्रम्प यांनी आणलेल्या एका कर विधेयकावर मस्क यांनी सार्वजनिकपणे टीका केली. मस्क यांनी या विधेयकाला 'पैशाचा अपव्यय' असे म्हटले होते. त्यांनी आरोप केला होता की हे विधेयक जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. यावर कोणतीही चर्चा होऊन नये यासाठी ते रात्रीतून मंजूर करण्यात आले.
या टिप्पणीमुळे संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी मस्क यांच्यावर पलटवार केला. ट्रम्प म्हणाले की, मस्क यांना या विधेयकाची पूर्ण माहिती होती, पण त्यांनी आधी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, जेव्हा मस्क यांना कळले की या विधेयकामुळे इलेक्ट्रिक वाहनांना मिळणाऱ्या सरकारी अनुदानात कपात केली जात आहे, तेव्हा त्यांना त्यांच्या कंपनीचे (टेस्ला) अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होईल याची जाणीव झाली. ट्रम्प यांनी मस्क यांना सरकारी अनुदाने पूर्णपणे बंद करण्याबद्दलही धमकी दिली होती.
वाचा - आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
आता हा वाद मिटल्याने अमेरिकन राजकारण आणि व्यवसायाच्या जगामध्ये एक महत्त्वाचा 'पॅच-अप' झाल्याचे मानले जात आहे.