डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांमध्ये टॅरिफ लादून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय आणि अजूनही ते भारत आणि चीनसारख्या देशांशी संबंध बिघडवत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादला आहे आणि २७ ऑगस्टपासून ते अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादणार आहेत. दरम्यान, एका अमेरिकन अर्थतज्ज्ञानं ट्रम्प यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.
राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचे माजी सल्लागार आणि सर्वोच्च अर्थशास्त्रज्ञ स्टीव्ह हँके यांनी ट्रम्प टॅरिफबद्दल बोलताना ही फक्त सुरुवात असल्याचं म्हटलं. त्याचे परिणाम आणखी गंभीर होणार आहेत, असंही ते म्हणाले. एका मुलाखतीत हँके यांनी इशारा दिला की ट्रम्प यांची व्यापार धोरणं, भारतापासून त्यांचे अंतर आणि पाकिस्तानशी त्यांचे मैत्रीपूर्ण वर्तन आर्थिक आणि भू-राजकीय संकट निर्माण करू शकतात.
"सकाळी हात मिळवणी आणि रात्री..."
स्पष्टपणे बोलताना हँके म्हणाले की ट्रम्प हे अशी व्यक्ती आहेत जो सकाळी मोदींशी हात मिळवेल आणि रात्री त्यांच्या पाठीत खंजीर खुपसू शकतो. त्यांनी असा युक्तिवाद केला की भारत अमेरिकेच्या मोठेपणावर जास्त काळ अवलंबून राहू शकत नाही. चीन अधिक प्रभावशाली आहे. जसे आपण म्हणत आलो आहोत, त्यांच्याकडे खाणकाम, धातूशास्त्र आणि भौतिकशास्त्र या स्वरूपात मोठी शस्त्रं आहेत. चीन तिन्ही क्षेत्रांवर वर्चस्व गाजवतो, असंही त्यांनी नमूद केलं.
पाकिस्तानवर प्रेम का?
चीनच्या या वर्चस्वामुळे ट्रम्प यांना पुन्हा एकत्र येण्यास भाग पाडले. ट्रम्प भारतापासून दूर जाऊन पाकिस्तानकडे वळण्याचे कारण पाकिस्तानला यासर्वांत आणणं आहे असं मला वाटतं. याचं कारण अर्थव्यवस्था नाही तर भूराजकीय परिस्थिती आहे. पाकिस्तानचे फील्ड मार्शल गेल्या महिन्यात दोनदा अमेरिकेला भेट देऊन आले आहेत. ते इराणवर आणखी एक हल्ला किंवा संभाव्य हल्ल्याची तयारी करत आहेत, असंही ते म्हणाले.
मंदीच्या उंबरठ्यावर अमेरिका?
हँके यांनी या टॅरिफबद्दल सांगितलं की, हा अमेरिकन ग्राहकांसाठी एक छुपा कर आहे. हा कर इतर कुठूनही येत नाही, तर अमेरिकेतूनच येतो, कारण भारतीय उत्पादनं खरेदी करताना अमेरिकेतील लोकांना त्याचा जास्त त्रास सहन करावा लागेल. टॅरिफमुळे वाढत्या किमतींचे परिणाम खूप दूरवर जाऊ शकतात. गेल्या अडीच वर्षांत अमेरिकन चलन खूप कमकुवत झालंय. अर्थव्यवस्था डळमळीत होत आहे. अमेरिका मंदीच्या उंबरठ्यावर आहे. ट्रम्प यांची ही धोरणं विनाशाकडे नेत असल्याचाही आरोप त्यांनी केला.