Top 5 Stocks to Buy : शेअर बाजारातील सध्याची अस्थिरता पाहता, गुंतवणूकदारांचे लक्ष आता भक्कम मूलभूत आधार असलेल्या कंपन्यांकडे वळले आहे. दिग्गज ब्रोकरेज फर्म 'मोतीलाल ओसवाल'ने आगामी काळासाठी हॉटेल, ऑटो, विमा आणि हेल्थकेअर क्षेत्रातील पाच दर्जेदार शेअर्सवर 'बाय' रेटिंग दिले आहे. या कंपन्यांची व्यावसायिक रणनीती आणि भविष्यातील विस्ताराचे नियोजन पाहता, गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
१. लेमन ट्री हॉटेल्स, लक्ष्य किंमत : २०० रुपये
हॉटेल क्षेत्रात 'लेमन ट्री' आपली पकड घट्ट करत आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात ८% वाढ झाली असून नफा १७ टक्क्यांनी वाढला आहे. नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या कंपनीसाठी 'गेमचेंजर' ठरणार आहे. अटल सेतूमुळे वाढलेली कनेक्टिव्हिटी आणि औरिका मुंबईसारख्या प्रिमियम प्रॉपर्टीजमुळे कंपनीचा महसूल दुहेरी अंकात वाढण्याची शक्यता आहे.
२. एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज, लक्ष्य किंमत : ३,२१५ रुपये
ऑटो कंपोनंट क्षेत्रातील ही दिग्गज कंपनी आता दुचाकींसोबतच चारचाकी वाहनांच्या सुट्या भागांच्या निर्मितीत वेगाने विस्तार करत आहे. कंपनीचे नवीन अलॉय व्हील फॅसिलिटी आणि प्रगत ब्रेकिंग सिस्टम मधील गुंतवणूक फायदेशीर ठरत आहे. सौर ऊर्जा आणि ॲल्युमिनियम फोर्जिंग सारख्या नवीन क्षेत्रांतील प्रवेशामुळे कंपनीच्या नफ्यात १६-१७% चक्रवाढ वाढ अपेक्षित आहे.
३. सफारी इंडस्ट्रीज, लक्ष्य किंमत : २,७०० रुपये
प्रवासाची आवड वाढल्याने बॅग आणि लगेज मार्केटमध्ये 'सफारी'ने आपला वाटा वाढवला आहे. विशेषतः टायर-२ आणि टायर-३ शहरांमध्ये कंपनीचा विस्तार वेगाने सुरू आहे. कंपनीचे 'अर्बन जंगल' आणि 'एसआय-सिलेक्ट' हे प्रिमियम ब्रँड्स ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. जयपूरमधील प्लांटच्या विस्तारामुळे खर्च कमी होऊन नफ्याचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.
४. एसबीआय लाईफ इन्शुरन्स, लक्ष्य किंमत : २,२४०
विमा क्षेत्रात एसबीआय लाईफ आपली आघाडी टिकवून आहे. संरक्षणात्मक आणि नॉन-पार्टिसिपेटिंग उत्पादनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. कंपनीचे 'व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस' मार्जिन २७.९% वर पोहोचले आहे. डिजिटल सोर्सिंग आणि ग्राहकांमधील विम्याबद्दलची वाढती जागरूकता यामुळे दीर्घकाळात ही कंपनी चांगली कामगिरी करेल असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
५. सॅजिलिटी इंडिया, लक्ष्य किंमत : ६३ रुपये
हेल्थकेअर बीपीओ क्षेत्रात काम करणारी ही कंपनी तंत्रज्ञानाचा (AI आणि GenAI) प्रभावी वापर करत आहे. अमेरिकेतील मोठ्या आरोग्य विमा कंपन्यांसोबत यांचे दीर्घकालीन करार आहेत. अमेरिकेतील आरोग्य सेवा क्षेत्रातील वाढता खर्च आणि आऊटसोर्सिंगची गरज यामुळे सॅजिलिटीला मोठा फायदा होत आहे. आगामी काळात कंपनीच्या नफ्यात ३० टक्क्यांहून अधिक वाढ होण्याचा अंदाज आहे.
गुंतवणूक चार्ट
| कंपनीचे नाव | क्षेत्र | लक्ष्य किंमत (रुपये) | अंदाजित वाढ |
| लेमन ट्री हॉटेल्स | पर्यटन/हॉटेल | २०० | २४% (नफा) |
| एन्ड्युरन्स टेक | ऑटो पार्टस् | ३,२१५ | १६% (नफा) |
| सफारी इंडस्ट्रीज | लगेज/रिटेल | २,७०० | २३% (नफा) |
| एसबीआय लाईफ | विमा | २,२४० | १०% (नफा) |
| सॅजिलिटी इंडिया | हेल्थकेअर IT | ६३ | २५% (नफा) |
वाचा -
(डिस्क्लेमर : शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा. यात सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
