artificial intelligence : सध्या जगभरात 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'ची लाट असून तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी उलथापालथ होत आहे. मात्र, या एआयच्या शर्यतीत सध्या एकाच देशाचा एकछत्री अंमल पाहायला मिळत आहे, तो म्हणजे अमेरिका. विशेष म्हणजे, मार्केट कॅपिटलायझेशननुसार जगातील पहिल्या १० एआय कंपन्यांपैकी सर्वच्या सर्व १० कंपन्या अमेरिकेतील आहेत. यामध्ये 'एनव्हिडिया' आणि 'ॲपल'ने आपली आघाडी कायम ठेवली आहे.
अमेरिकेचा 'दशका'तील मोठा करिष्मा
बाजार भांडवलाच्या बाबतीत एआय क्षेत्रात अमेरिकन कंपन्यांनी इतर देशांना मागे टाकले आहे. एनव्हिडिया ही केवळ एआय क्षेत्रातच नाही, तर कोणत्याही क्षेत्रातील जगातील सर्वात मौल्यवान कंपनी ठरली आहे.
टॉप १० एआय कंपन्यांची यादी (मार्केट कॅपिटलायझेशन - लाख कोटी रुपयांत)
- एनव्हिडिया : ३९६.६९५ (अमेरिका)
- ॲपल : ३४७.३३३ (अमेरिका)
- अल्फाबेट : ३३१.२१६ (अमेरिका)
- मायक्रोसॉफ्ट : २७८.९९० (अमेरिका)
- मेटा प्लॅटफॉर्म्स : १४९.७२३ (अमेरिका)
- टेस्ला : १३६.६४३ (अमेरिका)
- ओरॅकल : ४०.३५१ (अमेरिका)
- पलान्टिर : ३४.५०० (अमेरिका)
- आयबीएम : २२.२८६ (अमेरिका)
- अडोब : १०.८९७ (अमेरिका)
भारताची पाटी कोरी; चीन-इस्राईलची धडपड
जगातील पहिल्या ६३ आघाडीच्या एआय कंपन्यांचा विचार केला तर त्यामध्ये ४४ कंपन्या एकट्या अमेरिकेच्या आहेत. या यादीत चीनच्या ६, इस्राईलच्या ४, सिंगापूर आणि यूएईच्या प्रत्येकी २ कंपन्यांचा समावेश आहे. मात्र, तंत्रज्ञानाचा मोठा गाजावाजा करणाऱ्या भारताची एकही कंपनी सध्या या जागतिक क्रमवारीत स्थान मिळवू शकलेली नाही, ही चिंतेची बाब मानली जात आहे.
वाचा - पाकिस्तानच्या उंबरठ्यावर ऊर्जा संकट! कतार पाठोपाठ कुवेतचाही दणका; इंधन साठा संपण्याच्या मार्गावर
अनलिस्टेड कंपन्यांचेही मोठे योगदान
वरील रँकिंग हे केवळ 'शेअर बाजारात सूचिबद्ध' असलेल्या कंपन्यांच्या आधारावर आहे. याशिवाय ओपनएआय, अँथ्रोपिक आणि डेटाब्रिक्स यांसारख्या अनलिस्टेड कंपन्या देखील एआयच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवत आहेत.
