मुंबई: शेअर बाजारात सोमवारचा दिवस सीएट लिमिटेड (CEAT Ltd) या टायर उत्पादक कंपनीसाठी खास ठरला. खरे तर, सप्टेंबर तिमाहीतील उत्कृष्ट आर्थिक कामगिरीमुळे, गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली आणि कंपनीच्या शेअरने नवा उंचांक गाठला.
सकाळच्या सत्रात बीएसईवर ३७३० रुपयांवर खुला झालेला सीएटचा शेअर, दिवसाअखेर सुमारे १४ टक्क्यांच्या तेजीसह ४२५१.७० रुपयांवर पोहोचला. हा या शेअरचा ५२ आठवड्यांच्या उच्चांक आहे. यानंतर, बाजार बंद होताना हा शेअर १२.५५ टक्क्यांच्या वाढीसह ४२०१.५५ रुपयांवर स्थिरावला.
उत्कृष्ट तिमाही निकाल -
सीएट लिमिटेडचा सप्टेंबर तिमाहीतील निव्वळ नफा (Net Profit) गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ५४ टक्क्यांनी वाढून १८६ कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी तो १२२ कोटी रुपये एवढा होता. कंपनीच्या महसुलात (Revenue) देखील १२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. महसूल ३३०४.५० कोटींवरून वाढून ३७७२.७० कोटी रुपये झाला आहे. तसेच, या तिमाहीत कंपनीचा EBITDA ३९ टक्क्यांनी वाढून ५०३.७० कोटी रुपये झाला आहे.
कंपनीने शेअर बाजारात गेल्या एका वर्षात ४१ टक्के, तर ६ महिन्यांत ३९ टक्के असा जबरदस्त परतावा दिला आहे. सध्या कंपनीचे बाजार भांडवल (Market Cap) १६,९९५.३१ कोटी रुपये आहे. महत्वाचे म्हणजे, कंपनीने ऑगस्ट महिन्यात प्रति शेअर ₹३० एवढा लाभांश देखील दिला होता. कंपनीचा 52 आठवड्यांचा नीचांक २३२२.०५ रुपये आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)