शेअर बाजारातील सिल्वरलाइन टेक्नॉलॉजीजच्या शेअरमध्ये बुधवारी जबरदस्त तेजी दिसून आली. कंपनीच्या बोर्डाने 'ट्रूलेजर टेक्नॉलॉजीज FZE' कडून ८० कोटी रुपयांच्या धोरणात्मक गुंतवणुकीला तत्त्वतः मंजुरी दिल्यानंतर, ही तेजी दिसत आहे. या मंजुरीनंतंर, हा शेअर ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह १७.७९ रुपयांच्या उच्चांकावर स्थिरावला. या प्रस्तावित करारानुसार, ट्रूलेजरला कंपनीत २० टक्के इक्विटी एवढी भागीदारी मिळेल. महत्वाचे म्हणजे, २०२६ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत, या शेअरने १०५ टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.
मूल्यांकन आणि विस्तार योजना
या गुंतवणुकीमुळे कंपनीचे 'पोस्ट-मनी' व्हॅल्यूएशन सुमारे ४०० कोटी रुपये एवढे मानले जात आहे. ही नवीन रक्कम कंपनीचा ताळेबंद (Balance Sheet) मजबूत करण्यासाठी, नवीन प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि तंत्रज्ञान आधारित विस्तारासाठी वापरली जाईल. मात्र, हा व्यवहार अंतिम होण्यापूर्वी वैधानिक मंजुरी आणि मूल्यांकनाची पडताळणी होणे बाकी आहे.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीएफओ याकिन जोशी यांनी सांगितले की, ही गुंतवणूक दीर्घकालीन धोरणासाठी महत्त्वपूर्ण असून यामुळे भागधारकांचे मूल्य वाढण्यास मदत होईल. बोर्डाने व्यवस्थापनाला अटी व शर्तींवर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.
‘सिल्वर AI’ नावाचे प्लॅटफॉर्म लाँच
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात पकड मजबूत करण्यासाठी कंपनीने अलीकडेच ‘सिल्वर AI’ नावाचे प्लॅटफॉर्म लाँच केले आहे. अवघ्या दोन दिवसांत २४,००० हून अधिक वापरकर्त्यांनी यावर नोंदणी केली आहे. हा प्लॅटफॉर्म कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि वर्कफ्लो मॅनेजमेंटसाठी उपयुक्त ठरत आहे.
