नवी दिल्ली - २०२४ मध्ये जगभरातील अब्जाधीशांची संपत्ती २ लाख कोटी डॉलरने वाढून १५ लाख कोटी डॉलर झाली असून, अब्जाधीशांच्या संपत्तीतील ही वाढ आदल्या वर्षीच्या तुलनेत तिपटीने जास्त आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनलने सोमवारी जारी केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे.
‘जागतिक आर्थिक मंच’च्या वार्षिक बैठकीच्या पूर्वसंध्येला ऑक्सफॅमकडून ‘टेकर्स नॉट मेकर्स’नामक असमानता अहवाल जारी करण्यात येतो. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. गरीब आणि श्रीमंतांच्या संपत्तीचा आढावा अहवालात घेण्यात आला आहे. अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढ होण्याचा वेग तिपटीने वाढलेला असताना गरिबांच्या स्थितीत १९९० नंतर विशेष बदल झालेला नसल्याचे आढळून आले आहे. ऑक्सफॅमने म्हटले की, २०२४ मध्ये आशियाई अब्जाधीशांची संपत्ती २९९ अब्ज डॉलरने वाढली आहे.
टॉप १० जणांच्या संपत्तीत १०० दशलक्ष डॉलरची भर
- अब्जाधीशांची ६० टक्के संपत्ती आता वारसा हक्काने अथवा एकाधिकारशाहीच्या जोरावर प्राप्त होते.
- २०२३ मध्ये जगात २,५६५ अब्जाधीश होते. २०२४ मध्ये ही संख्या वाढून २,७६९ झाली.
- सर्वोच्च १० अब्जाधीशांची संपत्ती दररोज १०० दशलक्ष डॉलरने वाढली. त्यांची संपत्ती इतकी आहे की, त्यांनी आपली ९९ टक्के संपत्ती रातोरात गमावली तरीही ते अब्जाधीशच राहतील.