मनोज गडनीस
गेल्या अडीच दशकांत सोन्याच्या किमती बघता बघता गगनाला भिडल्या. मात्र, त्या कितीही वाढल्या तरी सोने हा मौल्यवान धातू भारतीयांच्या जिव्हाळ्याच्या विषय आहे. त्यामुळे केवळ लग्नसराई किंवा घरात मंगलकार्य असेल तरच सोन्याची खरेदी होते असे नाही, तर गुरुपुष्यामृत योग आणि साडेतीन मुहुर्तावरही झेपेल तितकी सोन्याची खरेदी आजही केली जाते. अर्थात गुरुपुरुष्यामृत योग साधून १९९० ते २०००च्या दशकातील पिढी ज्याप्रमाणे नियमितपणे सोन्याची खरेदी करायची तितकी आता करत नाही. याचे स्वाभाविक कारण सोन्याच्या वाढलेल्या किमती हे आहे. कारण त्यावेळी सोन्याच्या किमतीनुसार एखाद ग्रॅमचं सोन्याचं वळं खरेदी करण्याकडे लोकांचा कल असायचा. सोन्याचे वळं खरेदी करण्यामागे दोन हेतू असायचे. कारण ही वळं खरेदी म्हणजे एक प्रकारची सोन्याची एसआयपी असायची आणि दुसरे म्हणजे बऱ्यापैकी वळी साठली आणि त्यातून दागिना घडवायचा झाला तरी त्या वळ्यातील सोन्यामध्ये घट पकडली जायची नाही. मात्र, आता २५ वर्षात काळ बदलला. तसा सोने खरेदीचा ट्रेन्डही बदलत जाताना दिसत आहे.
ऐंशी किंवा नव्वदीतील ज्या पिढीने सोन्याची एसआयपी पद्धतीने खरेदी केली होती, त्या पिढीला आता आपल्या मुलांच्या लग्नात सोन्याचे दागिने घडवताना ते सोने उपयोगी पडत आहे. सोने खरेदी करताना त्या पिढीच्या मनात प्रामुख्याने दोन विचार असायचे. पहिला विचार म्हणजे आपल्या मुलाच्या लग्नात ऐनवेळी सोने खरेदीत एकरकमी पैसे जायला नको म्हणून 'थेंबे थेंबे तळे साचे' पद्धतीने सोने खरेदी करायची आणि दुसरे म्हणजे शाश्वत गुंतवणुकीचे साधन म्हणूनदेखील सोने खरेदीवर भर दिला जायचा
नाजूक, नजाकतदार दागिन्यांकडे ओढा
आजच्या पिढीचा 'जेन झी' असा उल्लेख सर्रास केला जातो. त्यांचा सोन्याच्या खरेदीकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा वेगळा आहे. या पिढीचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य असे की, त्यांना लवकर उत्पन्न मिळू लागते आणि करिअरच्या सुरुवातीलाच फारशा आर्थिक जबाबदाऱ्या नसताना त्यांचे उत्पन्न तुलनेने घसघशीत आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना ते वापरण्यासाठीच घ्यायचे हा प्रमुख हेतू त्यांच्या डोळ्यासमोर असतो. त्यामुळे ते सोने २४ कॅरेटचेच असले पाहिजे, असा त्यांचा अट्टाहास नसतो. ९ कॅरेट आणि १४ कॅरेट सोन्याच्या नाजूक, नजाकतदार दागिन्यांना ते पसंती देताना दिसतात.
कोणत्या सोन्याला देतात अधिक पसंती?
सोन्याची खरेदी आणि 'जेन झी'ची पसंती हा झाला एक भाग. ही नवीन पिढी आता गुंतवणुकीबाबतही अत्यंत सजग आहे. त्यामुळे आपला पोर्टफोलिओ परिपूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट, मनी मार्केट, शेअर मार्केट, मुदत ठेवी यांच्याप्रमाणेच २४ कॅरेट सोन्याच्या खरेदीलादेखील पसंती देत आहेत. पूर्वी लोक ज्याप्रमाणे सोन्याचे वळ खरेदी करायचे त्याऐवजी आता १ ग्रॅम, २ किंवा त्यापुढे परवडेल त्याप्रमाणे नाण्याच्या खरेदीला पसंती दिली जात आहे. काळ बदलला, पण, सोने खरेदीचे आकर्षण मात्र आजही सोन्याइतकेच शाश्वत आहे.
