लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेअर्स मार्केटमध्ये सुमारे १६ लाख रुपये बुडाल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या रवींद्र शिवाजी कोल्हे (३०) या तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याची घटना बुधवारी सातपूर परिसरात घडली. या घटनेत ९८ टक्के भाजलेल्या या तरुणाचा तिसऱ्या दिवशी शुक्रवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
चांदवड तालुक्यातील विटाई येथील रहिवासी व सध्या खुटवडनगर परिसरात राहणारा रवींद्र प्रारंभी खासगी इन्शुरन्स कंपनीत नोकरीला होता. नंतर तो खासगी बँकेत नोकरी करू लागला. त्याने त्याला मिळत असलेले पैसे शेअर्स मार्केटमध्ये गुंतवले होते. मार्केट पडल्याने कंगाल झाल्याने तो नैराश्यात होता. ज्योती विद्यालयाच्या मोकळ्या मैदानावर जाऊन त्याच्या दुचाकीतील पेट्रोल काढून स्वतःच्या अंगावर ओतून पेटवून घेतले.