देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक HDFC ने आपल्या कर्जदारांना दिवाळीपूर्वीच खास गिफ्ट देत मोठा दिलासा दिला आहे. बँकेने आपल्या कर्जाच्या व्याजदरांत कपात करण्याची घोषणा केली आहे. याचा थेट फायदा गृह कर्ज आणि इतर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या मासिक हप्त्यांवर अर्थात EMI वर होणार आहे.
बाजार मूल्यानुसार, देशातील सर्वात मोठ्या आणि टॉप-१० मौल्यवान कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या HDFC बँकेने 'मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट' अर्थात MCLR मध्ये कपात केली आहे. या कपातीमुळे, MCLR शी जोडलेले कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या मासिक EMI मध्ये घट होण्याची शक्यता आहे.
बँकेने काही निवडक कालावधीसाठी MCLR मध्ये १५ बेसिस पॉइंटपर्यंत कपात केली आहे. या बदलानंतर, HDFC बँकेचा MCLR आता कर्जाच्या कालावधीनुसार ८.४०% ते ८.६५% दरम्यान राहील, जो पूर्वी ८.५५% ते ८.७५% दरम्यान होता.
'ओव्हरनाईट' MCLR ८.५५% वरून ८.४५% वर -
या कपातीमुळे विविध मुदतीच्या कर्जाचे दर खाली आले आहेत. 'ओव्हरनाईट' MCLR ८.५५% वरून ८.४५% करण्यात आला आहे, तर एका महिन्याचा दर ८.४०% झाला आहे. तीन महिन्यांच्या कर्जाचा दर १५ बेसिस पॉइंटने कमी होऊन ८.४५% झाला आहे.
तीन वर्षांसाठीचा दर ८.६५% -
याशिवाय, सहा महिने आणि एक वर्षाच्या मुदतीच्या कर्जासाठी MCLR दर १० बेसिस पॉइंटने कमी होऊन ८.५५% वर आला आहे. दीर्घ मुदतीचा विचार केल्यास, दोन वर्षांसाठीचा दर ८.६०% आणि तीन वर्षांसाठीचा दर ८.६५% इतका ठेवण्यात आला आहे.