Interim Trade Deal :अमेरिका आणि भारत सरकार यांच्यात नुकत्याच झालेल्या ऐतिहासिक अंतरिम व्यापार कराराने जागतिक बाजारपेठेत मोठी खळबळ उडवून दिली आहे. या करारानुसार, अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील टॅरिफ ५० टक्क्यांवरून थेट १८ टक्क्यांपर्यंत खाली आणले आहेत, तर प्रत्युत्तरादाखल भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मात्र, या कराराने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांना मोठा धक्का दिला असून, त्यांच्या 'टेस्ला' कारला या सवलतीतून बाहेर ठेवण्यात आले आहे.
हार्ले-डेव्हिडसन सुसाट, पण टेस्लाचा ब्रेक!
या करारानुसार, ३००० सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या उच्च श्रेणीतील अमेरिकन पेट्रोल-डिझेल कार आणि हार्ले-डेव्हिडसन सारख्या बाइक्सवरील आयात शुल्क ११० टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येणार आहे. मात्र, इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश या सवलतीच्या यादीत करण्यात आलेला नाही. मस्क यांनी अनेकदा भारताच्या उच्च आयात शुल्कावर टीका केली होती. मात्र, तरीही त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
युरोपला सवलत, पण अमेरिकन 'ईव्ही'ला नाही?
भारताने युरोपीय महासंघासोबत केलेल्या करारात काही इलेक्ट्रिक वाहनांवरील टॅरिफ थेट १० टक्क्यांपर्यंत कमी केले होते. त्या तुलनेत अमेरिकन ईव्हीवर कोणतीही सवलत न देणे, हे टेस्लासाठी मोठे धोरणात्मक अपयश मानले जात आहे.
भारतीय बाजारपेठेत टेस्लाची 'बॅटरी' लो!
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, टेस्ला भारतामध्ये पाय रोवण्यासाठी संघर्ष करत आहे. २०२५ मध्ये टेस्ला भारतामध्ये केवळ २२७ कार विकू शकली. विक्री वाढवण्यासाठी टेस्ला आता ठराविक मॉडेल्सवर २ लाख रुपयांपर्यंत सवलत देत आहे, तरीही ग्राहक पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. जागतिक स्तरावर चीनच्या BYD कंपनीने टेस्लाला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे, तर टेस्लाची विक्री सलग दुसऱ्या वर्षी घटली आहे.
वाचा - पर्सनल लोनपेक्षा गोल्ड लोन स्वस्त! १ लाखाच्या कर्जावर किती बसेल हप्ता? जाणून घ्या सोपे गणित
रशिया-भारत तेल संबंधांवर परिणाम
या कराराचा सर्वात मोठा भू-राजकीय परिणाम म्हणजे भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याचे दिलेले आश्वासन. अमेरिकेने भारतीय मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात भारताला रशियापासून दूर नेण्याचा हा प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे.
