Bloomberg Billionaire List: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सर्वेसर्वा एलन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. बुधवारी त्यांच्यावर डॉलर्सचा असा पाऊस पडला की, एकाच दिवसात त्यांनी ४२.२ अब्ज डॉलरची कमाई केली. 'ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्स'नुसार, या वाढीनंतर मस्क यांची एकूण संपत्ती ६८३ अब्ज डॉलरवर पोहोचली. नवीन वर्षाच्या अवघ्या १४ दिवसांत मस्क यांची संपत्ती ६३.१ अब्ज डॉलरनं वाढली.
इतर अब्जाधीशांचं मोठं नुकसान
दुसरीकडे, ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्समधील टॉप-१० अब्जाधीशांना बुधवारी मोठे झटके बसले. जेफ बेजोस यांना ५.२२ अब्ज डॉलर, लॅरी एलिसन यांना ८.८५ अब्ज डॉलर, मार्क जुकरबर्ग यांना ५.३२ अब्ज डॉलर आणि बर्नार्ड अर्नाल्ट यांना २.४८ अब्ज डॉलरचा फटका बसला आहे. स्टीव्ह बाल्मर यांना ३.५५ अब्ज डॉलर आणि जेन्सेन हुआंग यांना २.१६ अब्ज डॉलरचे नुकसान सोसावं लागलं आहे. तसेच लॅरी पेज यांना ७०.५ मिलियन डॉलर, सर्गेई ब्रिन यांना ९० मिलियन डॉलर आणि वॉरेन बफे यांना ११८ मिलियन डॉलरचा फटका बसला आहे.
मस्क यांच्या कंपन्यांमधील हिस्सा
मस्क हे जगातील सर्वात मौल्यवान कार बनवणारी कंपनी 'टेस्ला' आणि खाजगी रॉकेट व्यवसाय 'स्पेसएक्स'चे सीईओ आहेत. कंपनीच्या २०२५ च्या प्रॉक्सी स्टेटमेंटनुसार, मस्क यांच्याकडे टेस्लाचा सुमारे १२% हिस्सा आहे. त्यांच्याकडे २०१८ च्या कम्पेनसेशन पॅकेजमधून (Compensation Package) सुमारे ३०४ मिलियन 'एक्सरसाइझेबल स्टॉक ऑप्शन्स' देखील आहेत.
ब्लूमबर्गच्या मते, स्पेसएक्सचे मूल्य डिसेंबर २०२५ च्या टेंडर ऑफरचा वापर करून निश्चित केलंय, ज्यामध्ये कंपनीचे मूल्य सुमारे ८०० अब्ज डॉलर इतके अंदाजित आहे. फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनच्या सप्टेंबर २०२५ च्या फायलिंगनुसार, एका ट्रस्टद्वारे मस्क यांच्याकडे या खाजगी कंपनीचा सुमारे ४२% हिस्सा आहे. यात ५% खाजगी कंपनी सवलत लागू केलीये. डिसेंबर २०२५ मधील नवीन मूल्यांकनाचा विचार करून एक ॲडजस्टमेंट करण्यात आलं, ज्यामुळे त्यांच्या एकूण संपत्तीत १६८ अब्ज डॉलरची वाढ झाली.
संपत्ती का वाढली?
xAI या कंपनीचे मूल्यांकन जानेवारी २०२६ च्या फंडिंग राऊंडचा वापर करून केलं गेलंय, ज्यामध्ये २० अब्ज डॉलर उभे केले गेले आणि पोस्ट-मनी व्हॅल्युएशन २३० अब्ज डॉलर होतं. कंपनीच्या भांडवल रचनेची माहिती असलेल्या एका व्यक्तीनुसार, या राऊंडनंतर मस्क यांच्याकडे कंपनीचा ५१% हिस्सा होता. यात १५% लिक्विडिटी डिस्काउंट लागू करण्यात आला आहे. जानेवारी २०२६ मध्ये लागू झालेल्या या नवीन मूल्यांकनामुळे त्यांच्या एकूण संपत्तीत ४८ अब्ज डॉलरची भर पडली आहे.
