Brian Thompson Death News: आरोग्य क्षेत्रात सेवा देणाऱ्या युनायटेड हेल्थकेअर कंपनीच्या सीईओची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. मॅनहट्टन शहरातील एका हॉटेलबाहेर ब्रायन थॉम्पसन यांच्यावर एका व्यक्तीने गोळ्या झाडल्या. बुधवारी सकाळी ही घटना घडली.
ब्रायन थॉम्पसन (brian thompson) हे मॅनहट्टनमध्ये होते. एका हॉटेलच्या बाहेर सकाळी ६.४५ वाजता त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. ब्रायन थॉम्पसन हे या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका वार्षिक गुंतवणूक परिषदेत सहभागी होण्यासाठी आले होते.
आरोपीने हॉटेल बाहेरच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ब्रायन थॉम्पसन यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी सांगितले की, गोळ्या झाडणारा व्यक्ती फरार झाला असून, आरोपीचा आणि त्याने गोळीबार का केला याचा तपास सुरू केला आहे.
आरोग्य सेवा क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या युनायटेड हेल्थ ग्रुप इंकच्या युनायटेड हेल्थकेअरची बुधवारी सकाळी न्यूयॉर्क शहरातील गुंतवणूकदारांसोबत वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली होती. ब्रायन थॉम्पसन त्यासाठीच आले होते.
सीसीटीव्हीत घटना कैद
ब्रायन थॉम्पसन यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. तो सगळा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हल्लेखोर हॉटेलच्या बाहेर ब्रायन थॉम्पसन यांची वाटत पाहत बसला होता. जसे ब्रायन थॉम्पसन तिथे पोहोचले, त्यानंतर हल्लेखोराने त्यांचा पाठलाग केला आणि गोळ्या झाडल्या.
पोलिसांच्या माहितीनुसार, हे टार्गेटींग किलिंग आहे. कारण ब्रायन थॉम्पसन यांची ते खूप वेळापासून वाट पाहत होते. ब्रायन यांच्या पाठीत आणि पायावर गोळी लागली. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर इलेक्ट्रिक सायकलवरून फरार झाला.
युनायटेड हेल्थकेअरचे सीईओ बनण्यापूर्वी ब्रायन थॉम्पसन इथे कर्मचारी म्हणून काम करत होते. ते तीन वर्षांहून अधिक काळ सीईओ म्हणून कार्यरत होते. ते २००४ पासून या कंपनीत काम करत होते.