Tech Mahindra : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या प्रभावामुळे जागतिक आयटी बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. परिणामी देशातील आघाडीच्या टीसीएस, विप्रो, इन्फोसिस सारख्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. आता भारतीय आयटी कंपन्यांनी नोकरभरतीबाबत अत्यंत सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील २०२५ च्या बॅचमधील १,००० हून अधिक विद्यार्थ्यांची निवड होऊनही 'टेक महिंद्रा'ने अद्याप त्यांना जॉइनिंग लेटर दिलेले नाही. यामुळे पदवी हातात पडण्यापूर्वीच नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या फ्रेशर्समध्ये चिंतेचे वातावरण आहे.
निवड झाली, पण 'ऑफर लेटर' गायब!
पुण्यातील एका विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ मध्ये दोन फेऱ्यांच्या परीक्षा आणि फेब्रुवारीत 'टेक महिंद्रा'च्या कार्यालयात मुलाखती पार पडल्या होत्या. मार्च २०२५ मध्ये अंतिम निवड यादी जाहीर होऊन वर्ष उलटले तरी विद्यार्थ्यांना अद्याप औपचारिक ऑफर लेटर मिळालेले नाही. टीसीएस सारख्या दिग्गज कंपनीनेही यापूर्वी ६०० लॅटरल हायर्सची ऑनबोर्डिंग प्रक्रिया लांबणीवर टाकली होती, हे विशेष.
'एआय'मुळे नोकरीची समीकरणे बदलली?
'अँथ्रोपिक' सारख्या कंपन्यांनी प्रगत एआय टूल्स आणल्यामुळे आयटी कंपन्यांच्या महसुलावर आणि भविष्यातील मार्गदर्शक तत्त्वांवर परिणाम झाला आहे. टेक महिंद्राचे सीईओ मोहित जोशी यांनी आधीच स्पष्ट केले होते की, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनी मागील वर्षाच्या तुलनेत कमी फ्रेशर्सची भरती करेल. सध्याच्या वातावरणात एआय-आधारित बदलांमुळे आयटी जॉब मार्केटमध्ये फ्रेशर्ससाठी जागा मिळवणे कठीण झाले आहे.
वाचा - तेलानंतर आता 'दुधा'साठी धावपळ? युद्धाच्या आगीत डेयरी उत्पादनांची पुरवठा साखळी धोक्यात
कामगार मंत्रालयाकडे दाद मागणार
पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांची संघटना 'एफआयटीई'चे सचिव प्रशांत पंडित यांनी या विषयावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. "टेक महिंद्राच्या १००० हून अधिक फ्रेशर्सना अद्याप जॉइनिंगची प्रतीक्षा आहे. आम्ही हा मुद्दा लवकरच कामगार मंत्रालयासमोर मांडणार आहोत," असे त्यांनी सांगितले. या प्रकरणावर टेक महिंद्राकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
