TCS Vacancy: आयटी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. देशातील आघाडीची आयटी कंपनी Tata Consultancy Services (TCS) ने आर्थिक वर्ष २०२७ (FY27) साठी २५,००० फ्रेशर्सना नोकरी देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की, आगामी काळात बाजारातील मागणी वाढल्यास भरतीचा आकडा आणखी वाढवला जाऊ शकतो.
युवा टॅलेंटवर TCSचा भर
TCS गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्सना संधी देत आहे. FY26 मध्ये कंपनीने सुमारे ४४,००० नवीन पदवीधरांना नोकरी दिली होती, जी खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या भरतींपैकी एक मानली जाते. यावरून कंपनीचा युवा टॅलेंटवर असलेला विश्वास स्पष्ट दिसून येतो.
भरतीचा आकडा मागणीवर अवलंबून
कंपनीचे सीईओ के क्रितीवासन यांच्या मते, भविष्यातील भरती पूर्णपणे व्यवसायिक मागणीवर अवलंबून असेल. जर प्रोजेक्ट्स आणि क्लायंट्सची संख्या वाढली, तर अधिक फ्रेशर्सना संधी दिली जाईल.
कंपनीने हेही स्पष्ट केले आहे की, लेटरल हायरिंग (अनुभवी कर्मचाऱ्यांची भरती) कमी ठेवून फ्रेशर्सना प्राधान्य देण्याची रणनीती कायम राहणार आहे.
ट्रेनिंग कालावधी महत्त्वाचा
फ्रेशर्सना पूर्णपणे कामासाठी तयार होण्यासाठी साधारण ६ ते ९ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी लागतो. त्याउलट अनुभवी कर्मचारी त्वरित काम सुरू करू शकतात. तरीही TCS फ्रेशर्सना संधी देण्यावर भर देत आहे.
नोकरकपातीबाबत कंपनीचे स्पष्टीकरण
FY26 मध्ये TCS ने सुमारे १२,०० कर्मचाऱ्यांची कपात केली होती. यावर कंपनीने स्पष्ट केले की, हा निर्णय AI मुळे नव्हता, तर कामाच्या पद्धतीत झालेल्या बदलांमुळे घेतला गेला. विशेषतः वरिष्ठ स्तरावरील काही पदांची गरज कमी झाल्याचे कंपनीने सांगितले.
मजबूत प्रोजेक्ट पाइपलाइन
कंपनीनुसार सध्या प्रोजेक्ट्सची पाइपलाइन स्थिर आहे, जे सकारात्मक संकेत मानले जात आहेत. FY26 मध्ये TCS ने सुमारे ४० अब्ज डॉलर्सचे नवीन कॉन्ट्रॅक्ट साइन केले आहेत. तसेच कंपनी नवीन भागीदारी आणि अधिग्रहणांवरही भर देत आहे. अलीकडेच AMD सोबत भागीदारी करण्यात आली आहे.
दरम्यान, TCSच्या या घोषणेमुळे आयटी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. भविष्यातील मागणी लक्षात घेता, येत्या काळात आणखी भरती होण्याची शक्यता असल्याने रोजगाराच्या संधी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
