tcs employees : गेल्या काही दिवसांपासून आयटी क्षेत्रातून सातत्याने नकारात्मक बातम्या येत होत्या. यात बहुतांश बातम्या ह्या नोकर कपातीच्या होत्या. इन्फोसिससह दिग्गज कंपन्यांनी नोकर कपातीचा निर्णय घेतल्याने आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना धक्का बसला होता. मात्र, आता टाटा समूहातील सर्वात मोठी कंपनी टीसीएसने त्यांच्या कर्मचाऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. जगातील आघाडीची आयटी सेवा प्रदाता कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने जानेवारी-मार्च तिमाहीसाठी त्यांच्या ७० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना १०० टक्के तिमाही भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीची कामगिरी सुधारली का? चला जाणून घेऊ.
टीसीएसचा नफा पुन्हा घटला
बातमीनुसार, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात १.७ टक्क्यांनी घट झाली आहे. कंपनीचा महसूल १२,२२४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मार्जिनमध्ये घट झाल्याने नफा घसरला आहे. आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीने एकूण ६४,४७९ कोटी रुपयांचा महसूल कमावला होता. जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा ५.३ टक्क्यांनी जास्त आहे. कंपनीने या तिमाहीत ६२५ कर्मचाऱ्यांची भरती केली, ज्यामुळे कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ६ लाखांहून अधिक झाली.
टॅरिफ धोरणामुळे पगारवाढ पुढे ढकलली
गेल्या महिन्यात चौथ्या तिमाही आणि आर्थिक वर्ष २०२५ च्या निकालांची घोषणा करताना टीसीएसने आपल्या ६.०७ लाख कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक पगारवाढ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे निर्णय घेतल्याचे सांगितले होते. कंपनीचे मुख्य मानव संसाधन अधिकारी मिलिंद लक्कड यांनी वार्षिक पगारवाढीला विलंब होण्याचे कारण व्यवसायातील अनिश्चितता असल्याचे सांगितले. कंपनीने पगारवाढ कधी जाहीर करणार याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. याचा अर्थ पगारवाढ होणार नसून फक्त महागाई भत्ता मिळणार आहे.
वाचा - पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
एआय म्हणजे नोकरीचा धोका नाही : अशोक क्रिश
एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजेन्स भविष्यात नोकऱ्या खाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) युनिटचे जागतिक प्रमुख अशोक क्रिश यांनी याला नकार दिला आहे. उलट एआय नवीन तंत्रज्ञानाच्या उदयाला चालना देईल. यामुळे फक्त कामाचे स्वरूप बदलेल, असं म्हटलं आहे. कौशल्य विकासासाठी एआयचा उपयोग होईल, असंही ते पुढे म्हणाले.