TCS Layoffs : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस नुकतेच आपले नोकर कपातीचे धोरण जाहीर केलं होतं. मात्र, या निर्णयानंतर कंपनीला मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागत आहे. 'युनाईट' (UNITE) या आयटी आणि आयटीईएस कर्मचारी संघाने टीसीएसच्या या निर्णयाविरोधात जोरदार निदर्शने केली आहेत. या छटणीमुळे सुमारे ३०,००० कर्मचारी प्रभावित होतील, असा आरोप कर्मचारी संघाने केला आहे. या आरोपांनंतर कंपनीनेही आपले अधिकृत निवेदन जारी केले आहे.
टीसीएसचा दावा : फक्त २% कर्मचाऱ्यांना काढणार
कर्मचारी संघाने केलेल्या दाव्यांचे टीसीएसने खंडन केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जागतिक पातळीवर एकूण कर्मचाऱ्यांपैकी फक्त २% कर्मचाऱ्यांनाच कामावरून काढले जाईल. टीसीएस या प्रक्रियेला 'पुनर्गठन' म्हणत आहे. मंगळवारी चेन्नईसह अनेक शहरांमध्ये या विरोधात निदर्शने झाली. असे असतानाही युनाईटचे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे ३०,००० कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होईल. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या सहकार्याने हे आंदोलन सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कंपनीने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली आहे.
वरिष्ठ कर्मचाऱ्यांना काढून कमी पगारात घेतलंय जातंय?
आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी असा आरोप केला आहे की, टीसीएस वरिष्ठ आणि व्यवस्थापकीय पदांवरील कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकत आहे. त्यांच्या जागी, कंपनी निम्मे किंवा त्याहूनही कमी पगारावर नवीन कर्मचाऱ्यांची भरती करत आहे. यामुळे चांगले कौशल्य आणि नेतृत्वाची क्षमता असलेल्या कर्मचाऱ्यांनाही नोकरी गमवावी लागत आहे, ज्यामुळे टीममध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.
वाचा - २२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
कर्मचारी संघाने दिला जागतिक आंदोलनाचा इशारा
कर्मचारी संघाने सरकारला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. जर सरकारने लक्ष दिले नाही, तर आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनांच्या मदतीने जागतिक स्तरावर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या सर्व आरोपांवर टीसीएसने स्पष्टीकरण दिले आहे की, कंपनीच्या पुनर्गठनाचा उद्देश क्लाऊड, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि डिजिटल परिवर्तनावर लक्ष केंद्रित करून भविष्यासाठी एक मजबूत संघटन तयार करणे हा आहे. कंपनीने हेही सांगितले की, नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती आणि संक्रमणकाळात आवश्यक ती मदत दिली जाईल.