Tatyana Kim Vs Mukesh Ambani : रशियामध्ये अब्जाधीशांची कमी नाही, पण गेल्या काही महिन्यांपासून एका नावाची सर्वाधिक चर्चा आहे—ते म्हणजे तात्याना किम. कमी वयात अमाप संपत्तीची मालकीण बनलेल्या किम आज रशियातील सर्वात श्रीमंत महिला मानल्या जातात. फोर्ब्सने काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या रशियातील अब्जाधीश महिलांच्या यादीत तात्याना किम यांनी पहिले स्थान पटकावले आहे. अब्जावधी डॉलर्सची संपत्ती आणि कंपनीतील मोठा हिस्सा यासह त्यांनी केवळ रशियातच नव्हे, तर जागतिक अब्जाधीशांच्या यादीतही आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
७.१ अब्ज डॉलरची संपत्ती
फोर्ब्सच्या अंदाजानुसार, तात्याना किम यांची एकूण संपत्ती ७.१ अब्ज डॉलर (सुमारे ५७१ अब्ज रुबल) इतकी आहे. तात्याना किम, यांना पूर्वी तात्याना बाकालचुक म्हणून ओळखले जात होते, त्या मूळच्या इंग्लिश शिक्षिका आणि सात मुलांच्या आई आहेत. त्यांनी २००४ मध्ये ई-कॉमर्स रिटेलर 'वाइल्डबेरीझ'ची सुरुवात केली. वयाच्या २८ व्या वर्षी, मॅटर्निटी लीव्हवर असताना त्यांनी मॉस्कोमधील आपल्या अपार्टमेंटमधून हा व्यवसाय सुरू केला. त्यांचे पती, व्लादिस्लाव बाकालचुक, जे एक आयटी तंत्रज्ञ आहेत, ते लवकरच या व्यवसायात त्यांच्यासोबत जोडले गेले.
पती व्लादिस्लाव बाकालचुक यांच्यासोबत झालेल्या हाय-प्रोफाइल घटस्फोटानंतरही, किम यांनी कंपनीतील ६४.३५ टक्के हिस्सा आपल्याकडे कायम ठेवला, ज्यामुळे त्यांच्या संपत्तीत स्थिरता टिकून राहिली.
मुकेश अंबानी यांच्याशी तुलना
तात्याना किम यांची संपत्ती रशियामध्ये सर्वाधिक असली तरी, जगातील आणि विशेषतः भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींशी तुलना केल्यास त्यांची संपत्ती लक्षणीयरीत्या कमी आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ११३.५ अब्ज डॉलर आहे. म्हणजे किम यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक आहे.
वाचा - UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
घटस्फोट आणि सेटलमेंट
वाइल्डबेरीझच्या संस्थापक असलेल्या ५० वर्षीय तात्याना किम आणि त्यांचे एक्स पती व्लादिस्लाव बाकालचुक यांनी त्यांच्या घटस्फोटाच्या कारवाईत मालमत्तेच्या वाटपावर अंतिम सेटलमेंट केली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये घटस्फोट अंतिम झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटपावरून त्यांच्यात वाद सुरू होता, विशेषतः जेव्हा रशियातील सर्वात मोठ्या ऑनलाइन रिटेलर 'वाइल्डबेरीझ'चे आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग कंपनी 'रस ग्रुप' सोबत विवादास्पद विलीनीकरण झाले होते.
