Tata Trusts : गेल्या काही दिवसांपासून देशातील सर्वात मोठा औद्योगिक समूह असलेल्या 'टाटा'मध्ये धुसफूस सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. समूहात २ गट पडल्याचीही चर्चा आहे. अशा स्थितीत टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी एक ऐतिहासिक 'हॅट्ट्रिक' साधली आहे. टाटा समूहाच्या नियमांमधून पहिल्यांदाच सूट देत, टाटा ट्रस्ट्सने चंद्रशेखरन यांच्या तिसऱ्या कार्यकारी कार्यकाळाला तत्वतः मंजुरी दिली आहे.
समूहाच्या धोरणानुसार, कार्यकारी पदांवरील अधिकाऱ्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी निवृत्त होणे अपेक्षित असते. चंद्रशेखरन हे फेब्रुवारी २०२७ मध्ये आपला दुसरा कार्यकाल पूर्ण झाल्यावर ६५ वर्षांचे होतील. मात्र, त्यांना आणखी पाच वर्षांचा कार्यकारी कार्यकाळ मिळणार आहे.
कार्यकाळ वाढवण्यामागचे कारण
सध्या टाटा समूह सेमीकंडक्टर उत्पादन, इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी प्रकल्प आणि एअर इंडियाचे पुनर्संघटन यांसारख्या अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रकल्पांच्या टप्प्यात आहे. कामात सातत्य राखण्यासाठी आणि हे महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी चंद्रशेखरन यांचे कार्यकारी नेतृत्व आवश्यक असल्याचे टाटा ट्रस्ट्सने मत व्यक्त केले आहे.
समूहात प्रथमच
समूहाच्या उच्च अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा ट्रस्ट्सच्या बैठकीत नोएल टाटा आणि वेणू श्रीनिवासन यांनी चंद्रशेखरन यांच्यासाठी पाच वर्षांचा तिसरा कार्यकारी कार्यकाळ प्रस्तावित केला आणि त्याला सर्वानुमते मंजुरी मिळाली.
निवृत्तीच्या वयोमर्यादेनंतरही सक्रिय कार्यकारी भूमिकेत कायम राहणारे चंद्रशेखरन हे टाटा समूहातील पहिले अधिकारी ठरतील.
वाचा - गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
चंद्रशेखरन यांची प्रभावी कामगिरी
जानेवारी २०१७ मध्ये अध्यक्षपद स्वीकारल्यापासून त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने प्रचंड प्रगती केली आहे. गेल्या पाच वर्षांत समूहाचा महसूल दुप्पट झाला, तर निव्वळ नफा आणि बाजार भांडवल तीन पटीने वाढले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाचे टाटा समूहात ६९ वर्षांनी पुनरागमन झाले, तसेच सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल ॲप्स सारख्या नवीन व्यवसायांमध्ये समूहाने यशस्वीपणे प्रवेश केला आहे.