Tata Stock Listing: टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेडच्या (Tata Motors Passenger Vehicles Ltd) लिस्टिंगनंतर, आता व्यावसायिक युनिटच्या लिस्टिंगची तारीखही समोर आली आहे. कंपनीनं सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक युनिटची लिस्टिंग १२ नोव्हेंबरला होईल.
माहितीनुसार, टाटा मोटर्सनं गेल्या महिन्यात आपले व्यावसायिक युनिट (Commercial Unit) आणि प्रवासी युनिट (Passenger Unit) वेगळं केलं होतं. प्रवासी युनिटची लिस्टिंग १४ ऑक्टोबरला झाली होती, परंतु व्यावसायिक युनिटची लिस्टिंग अजूनपर्यंत झाली नव्हती. टाटानं व्यावसायिक युनिटचं नाव टाटा मोटर्स असं ठेवलं आहे.
या गुंतवणूकदारांना मिळेल एक शेअर
रेकॉर्ड डेटवर ज्या गुंतवणूकदारांकडे टाटा मोटर्सचा एक शेअर असेल, त्यांना कंपनीनं व्यावसायिक युनिटचा एक शेअर आणि प्रवासी युनिटचा एक शेअर देण्याचा निर्णय घेतला होता. टाटा मोटर्स लिमिटेडच्या डिमर्जरपूर्वीच्या शेअरचा भाव ₹६६०.७५ होता. प्रवासी युनिट ₹४०० प्रति शेअर दरानं लिस्ट झाले होते. याव्यतिरिक्त, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड कडून १४ नोव्हेंबरला तिमाही निकालांची घोषणा केली जाईल. सोमवारी टाटा मोटर्स पॅसेंजर लिमिटेडचे शेअर १.२ टक्क्यांच्या वाढीसह ₹४१०.७० च्या पातळीवर बंद झाले होते.
डिमर्जर का करण्यात आलं?
टाटा मोटर्सचं म्हणणं होतं की, दोन वेगवेगळ्या कंपन्या असल्यामुळे दोन्ही युनिटच्या व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल, ज्यामुळे अधिक ग्रोथ रेट मिळवण्यास मदत होईल. पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेडचा व्यवसाय चारचाकी गाड्यांवर राहील, तर व्यावसायिक कंपनीचं लक्ष ट्रकसारख्या अधिक भार वाहणाऱ्या गाड्यांवर राहील.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
