Tata Group : गेल्या वर्षी टाटा समुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांच्याकडे समुहाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. नोएल टाटा यांनी अध्यक्षपदाची सुत्र हाती घेताच अनेक नवीन बदल केले आहेत. यामध्ये रतन टाटा यांनी सुरू केलेल्या काही परंपरा देखील खंडीत करण्यात आल्या. आता नवीन वर्षात आणखी एक मोठा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणे असलेल्या टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सने नवीन वर्षात मोठा निर्णय घेतला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा सन्सने समूह कंपन्यांना, विशेषतः टाटा डिजिटल, टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि एअर इंडियासारख्या नवीन कंपन्यांना त्यांची कर्जे आणि दायित्वे स्वतंत्रपणे व्यवस्थापित करण्यास सांगितले आहे. यासोबतच बँकांना लेटर ऑफ कम्फर्ट आणि क्रॉस-डिफॉल्ट क्लॉज देण्याची परंपरा टाटा सन्समध्ये बंद करण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, टाटा सन्सने बँकांना आपल्या नवीन पध्दतीची माहिती दिली असून भविष्यात इक्विटी गुंतवणूक आणि अंतर्गत स्रोतांद्वारे नवीन उपक्रमांना भांडवल वाटप केले जाईल.
टाटा सन्सने गेल्या वर्षी आरबीआयकडे आपले नोंदणी प्रमाणपत्र स्वेच्छेने सरेंडर केले होते. यापूर्वी कंपनीने अनलिस्टेड राहण्यासाठी २०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज फेडले होते. सूत्रांनी सांगितले की नवीन व्यवसायाला मुख्यत्वे लाभांश आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मधून निधी दिला जाईल. TCS ही टाटा समूहाची मार्केट कॅपनुसार सर्वात मोठी कंपनी असून देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. टाटा सन्सने बँकांना सांगितले आहे की प्रत्येक श्रेणीतील केवळ आघाडीची सूचीबद्ध कंपनीच होल्डिंग संस्था म्हणून काम करेल.
कोणत्या कंपन्यांवर परिणाम होईल?
सूत्रांनी सांगितले की, पारंपारिकपणे टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर आणि टाटा कंझ्युमर यासारख्या जुन्या सूचीबद्ध समूहातील बहुतेक कंपन्या त्यांचे कर्ज स्वतःच व्यवस्थापित करतात. त्यामुळे टाटा सन्सच्या भूमिकेतील बदलाचा त्यांच्यावर विशेष परिणाम होण्याची शक्यता नाही. गेल्या काही वर्षांपासून टाटा सन्सने सुरू केलेले व्यवसाय भांडवल वाटपासाठी होल्डिंग कंपनीवर अवलंबून आहेत. एका सूत्राने सांगितले की एकदा ते महत्त्वपूर्ण स्तरावर पोहोचले की, या कंपन्या त्यांच्या भांडवलाची आवश्यकता स्वतः व्यवस्थापित करतील.
टाटांसाठी बँकांच्या पायघड्या
टाटा सन्सने या कंपन्यांना काही वर्षांमध्ये आपल्या प्रमुख व्यवसायांमध्ये स्थान मिळण्यास तयार केले आहे आणि त्यांनी महत्त्वपूर्ण निधी आणला आहे. मात्र, टाटांच्या ऑपरेटींग कंपन्यांना कर्ज देण्यास बँकांना कोणतीही अडचण नाही. याचे कारण म्हणजे या कंपन्यांमध्ये टाटा सन्सचा मोठा हिस्सा आहे. बँकर्स म्हणाले की होल्डिंग कंपनीची आर्थिक स्थिरता आणि तिच्या उपकंपन्यांमधील मोठा इक्विटी स्टेक मोठी हमी आहे. यामुळेच बहुतांश मोठ्या बँका टाटा कंपन्यांना सर्वाधिक कर्ज देतात.