TPREL Plant : भारताला सौर ऊर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी टाटा समूहाने एक मोठे पाऊल उचलले आहे. टाटा समूहाची कंपनी 'टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी' आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे १० गीगावॉट क्षमतेचा 'इनगॉट आणि वेफर' निर्मितीचा मेगा प्रकल्प उभारणार आहे. हा देशातील अशा प्रकारचा सर्वात मोठा कारखाना असणार असून, यासाठी कंपनी ६,६७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
चीनवरील अवलंबित्व होणार कमी
सौर सेल आणि मॉड्यूल तयार करण्यासाठी 'इनगॉट' आणि 'वेफर' हे अत्यंत महत्त्वाचे कच्चे माल आहेत. सध्या या उपकरणांसाठी भारत मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून आहे. केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया' धोरणांतर्गत हा प्रकल्प उभारला जात असून, यामुळे सौर ऊर्जेच्या सुट्या भागांसाठी आपली चीनवरील भिस्त कमी होण्यास मदत होईल.
१,००० तरुणांना मिळणार रोजगार
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखालील 'स्टेट इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड'ने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. 'इफको किसान सेझ'मध्ये २०० एकर जमीन दिली असून, त्यापैकी १२० एकरवर हा प्रकल्प उभा राहील. या प्रकल्पामुळे थेट १,००० लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. या कारखान्याला लागणारी वीज सौर ऊर्जेतून मिळावी, यासाठी सरकार कंपनीला स्वतंत्र २०० मेगावॉटचा प्लांट लावण्यासाठी जागा देणार आहे.
ओडिशातून आंध्र प्रदेशात कशी वळली गुंतवणूक?
सुरुवातीला टाटा पॉवर या प्रकल्पासाठी ओडिशातील गोपालपूर आणि कटकचा विचार करत होती. मात्र, आंध्र प्रदेश सरकारने जमिनीची उपलब्धता आणि कृष्णपट्टणम बंदराचे सान्निध्य या जोरावर हा प्रकल्प खेचून आणला. नेल्लोर आता सौर निर्मितीचे मोठे केंद्र बनत असून, तेथे प्रीमियर एनर्जीज आणि वेबसोलसारख्या कंपन्यांचेही प्रकल्प येत आहेत.
वाचा - सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे दिग्गज कोण? सीतारामन आता कोणत्या स्थानी?
४९,००० कोटींच्या कराराचा भाग
७ मार्च २०२५ रोजी टाटा पॉवर आणि आंध्र प्रदेश सरकारमध्ये ४९,००० कोटी रुपयांच्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी सामंजस्य करार झाला होता. त्याअंतर्गत हा पहिला मोठा उत्पादन प्रकल्प आहे. टाटा पॉवरने यापूर्वी गुजरात (धोलरा), कर्नाटक (पावागढा), राजस्थान (बिकानेर) आणि मध्य प्रदेशात (नीमच) मोठे सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत.
