Tata Motors: भारतातील आघाडीची वाहन उत्पादनक कंपनी Tata Motors ने आता जागतिक बाजारपेठेत आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. आर्थिक वर्ष २०२६ मधील दमदार कामगिरी आणि पॅसेंजर व कमर्शियल वाहन व्यवसायाच्या विभाजनानंतर कंपनीने विस्ताराच्या नव्या टप्प्यात प्रवेश केला आहे.
JLR सोबत एकत्रित रणनीती
कंपनीचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी वार्षिक बैठकीत सांगितले की, पॅसेंजर व्हीकल व्यवसाय Jaguar Land Rover सोबत अधिक जवळ आणला जातोय. प्लॅटफॉर्म, तंत्रज्ञान आणि उत्पादन विकासात समन्वय वाढवण्यावर भर आणि १ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या डिमर्जरमुळे निर्णय प्रक्रिया अधिक जलद आणि स्पष्ट यामुळे कंपनीची कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
विक्रीत विक्रमी कामगिरी
आर्थिक वर्ष २०२६ मध्ये टाटा मोटर्सने दमदार विक्री नोंदवली. पॅसेंजर वाहन विक्रीने ६,४०,००० युनिट्स (१५% वाढ) सह देशांतर्गत बाजारात दुसरे स्थान मिळवले. Tata Nexon आणि Tata Punch मुळे SUV सेगमेंटमध्ये वाढ झाली. तर, इलेक्ट्रिक वाहन विक्री २,५०,००० युनिट्सपेक्षा अधिक राहिली.
कमर्शियल वाहन विभागातही वाढ
कमर्शियल व्हीकल सेगमेंटमध्येही कंपनीने चांगली कामगिरी केली. या विभागातील विक्री ४,३०,००० युनिट्स (१४% वाढ) होती. यात १७ नवीन ट्रक आणि टिपर लॉन्च करण्यात आले, तर Ace Pro मिनी ट्रकही बाजारात सादर केला. याशिवाय, ३,६०० पेक्षा अधिक इलेक्ट्रिक बसची डिलिव्हरी करण्यात आली. या बसेसने सार्वजनिक वाहतुकीत आतापर्यंत ५०० दशलक्ष किलोमीटरहून अधिक अंतर पार केले आहे.
जागतिक विस्तारासाठी मोठी पावले
टाटा मोटर्स आता इटलीतील Iveco या ट्रक उत्पादक कंपनीच्या अधिग्रहणावर काम करत आहे. हा व्यवहार यशस्वी झाल्यास जागतिक उपस्थितीत मोठी वाढ होईल आणि कंपनी जगातील टॉप ४ कमर्शियल वाहन उत्पादकांमध्ये स्थान मिळवू शकेल.
भविष्याची दिशा
कंपनी पुढील काळात झिरो-एमिशन मोबिलिटी, कनेक्टेड तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर-डिफाइंड व्हेईकल्स या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणार आहे. यामुळे कंपनीच्या भविष्यातील वाढीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
