TATA Motors Cyber Attack: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण दिसून येत आहे. बीएसईवर कंपनीचा शेअर सुमारे ४ टक्क्यांनी घसरून ६५५.३० रुपयांवर आला. टाटा मोटर्सची ब्रिटनमधील कंपनी जग्वार लँड रोव्हरवर (JLR) सायबर हल्ला झाल्यामुळे २ बिलियन पाउंड म्हणजेच सुमारे २,३८,६१,६६,००,००० रुपयांचं नुकसान होऊ शकतं, अशी बातमी समोर आली आहे. हे नुकसान मागील आर्थिक वर्षात JLR च्या एकूण प्रॉफिट आफ्टर टॅक्सपेक्षाही (profit after tax) अधिक असू शकतं.
फायनान्शियल टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, जेएलआरवर सायबर हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे JLR ला आपल्या अनेक कारखान्यांमधील उत्पादन थांबवावं लागलं. विशेष बाब म्हणजे, JLR नं अशा कोणत्याही घटनेसाठी विमा काढला नव्हता. यामुळे कंपनीवरील आर्थिक दबाव आणखी वाढला आहे. दरम्यान, उत्पादन २४ सप्टेंबरपर्यंत थांबवण्यात आलं होतं, जे नंतर १ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आले. यामुळे कंपनीच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे.
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."
किती नुकसान?
टाटा मोटर्सनं अद्याप नुकसानीच्या नेमक्या रकमेची पुष्टी केलेली नाही. परंतु, बातम्यांनुसार, कंपनीला दर आठवड्याला अंदाजे ५० दशलक्ष पाउंड किंवा ६८ दशलक्ष डॉलर्सचं नुकसान होत असल्याची माहिती आहे. JLR च्या ३३,००० कर्मचाऱ्यांना समस्या सुटेपर्यंत घरीच राहण्यास सांगण्यात आलंय. हे नुकसान खूप मोठं आहे, कारण टाटा मोटर्सच्या एकूण व्यवसायात JLR चा मोठा वाटा आहे. कंपनीच्या एकूण महसुलापैकी जवळपास ७०% हिस्सा JLR कडून येतो. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये JLR नं करानंतर १.८ बिलियन पाउंडचा नफा कमावला होता. याचा अर्थ, २ बिलियन पाउंडचं अंदाजित नुकसान संपूर्ण वर्षाच्या कमाईला संपवू शकतं किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते.
विमा पॉलिसीला अंतिम रुप नाही
रिपोर्टमध्ये असंही सांगितलं आहे की, घटनेपूर्वी JLR ने सायबर विमा पॉलिसीला अंतिम रूप दिलं नव्हतं. 'लॉकटन' नावाच्या कंपनीकडून ही पॉलिसी दिली जात होती, जी जगातील सर्वात मोठी स्वतंत्र विमा ब्रोकरेज फर्म आहे. परंतु, ही पॉलिसी पूर्ण झाली नव्हती. बुधवारी टाटा मोटर्सचे शेअर बीएसईवर २.७% घसरून ६८२.७५ रुपयांवर बंद झाले होते.