Tata Group vs Reliance Industries : भारताच्या अर्थव्यवस्थेचे दोन प्रमुख स्तंभ म्हणजे 'टाटा समूह' आणि 'रिलायन्स इंडस्ट्रीज'. अनेकदा या दोन्ही समूहांमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण किंवा सर्वात मोठी कंपनी कोणती, यावर चर्चा रंगते. मात्र, आज आपण त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांच्या संख्येचा लेखाजोखा मांडणार आहोत. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हे दिग्गज समूह नवनवीन उपकंपन्या आणि संयुक्त उपक्रम सुरू करत असतात.
रिलायन्स इंडस्ट्रीज : ३०० पार आकडा!
- मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने रिटेलपासून ते टेलिकॉमपर्यंत सर्वच क्षेत्रात आपल्या उपकंपन्यांचे जाळे विणले आहे. रिलायन्सकडे सध्या एकूण ३१२ कंपन्या आहेत.
- उपकंपन्या : रिलायन्सच्या नियंत्रणाखाली एकूण २९१ उपकंपन्या आहेत. यामध्ये ७-इंडिया कन्वीनियन्स, जिओ प्लॅटफॉर्म्स, रिलायन्स रिटेल आणि नेटमेड्स यांसारख्या बड्या नावांचा समावेश आहे.
- सहयोगी आणि संयुक्त उपक्रम : रिलायन्सकडे २१ सहयोगी कंपन्या आहेत. यामध्ये आलोक इंडस्ट्रीज, बालाजी टेलिफिल्म्स आणि जिओ स्पेस टेक्नॉलॉजी यांसारख्या कंपन्यांचा समावेश होतो.
टाटा समूह : ३५ दिग्गज ब्रँड्स आणि संस्थांचे जाळे
टाटा समूहाची कार्यपद्धती थोडी वेगळी आहे. टाटांकडे ३५ मोठ्या मुख्य कंपन्या आहेत, परंतु त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या उपकंपन्यांची यादी अत्यंत प्रदीर्घ आहे.
टाटांच्या साम्राज्यातील प्रमुख विभाग
- आयटी आणि तंत्रज्ञान : टीसीएस, टाटा एलेक्सी आणि टाटा टेक्नॉलॉजीज.
- ऑटोमोबाईल : टाटा मोटर्स आणि जग्वार लँड रोव्हर.
- रिटेल आणि ग्राहक उत्पादने : टायटन, तनिष्क, ट्रेंट (वेस्टसाईड, जूडिओ), क्रोमा आणि टाटा स्टारबक्स.
- विमान वाहतूक : एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस आणि ताज एअर.
- स्टील आणि ऊर्जा : टाटा स्टील आणि टाटा पॉवर.
- हॉस्पिटॅलिटी : इंडियन हॉटेल्स कंपनी (ताज हॉटेल्स, विवांता).
केवळ व्यवसाय नाही, तर सामाजिक वारसाही!
टाटा समूहाचे वेगळेपण त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये आहे. टाटांनी देशाला केवळ कंपन्या दिल्या नाहीत, तर जागतिक दर्जाच्या संस्थाही दिल्या आहेत.
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
- टाटा मेमोरियल हॉस्पिटल
- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च
वाचा - लेन्सकार्टपासून अंबरपर्यंत... अस्थिर बाजारातही 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात फायदेशीर! कारणही तसेच
नेमका फरक काय?
रिलायन्सची रचना ही मुख्यत्वे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या एकाच छताखाली अनेक उपकंपन्या अशी आहे. याउलट, टाटा समूहामध्ये अनेक स्वतंत्रपणे सूचीबद्ध असलेल्या मोठ्या कंपन्या आहेत, ज्यांच्या स्वतःच्या वेगळ्या उपकंपन्या आहेत.
