Tata Group : देशातील सर्वात मोठा उद्योग समूह असलेल्या टाटा ग्रुपने दिवाळीपूर्वी इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात एक मोठी खरेदी केली आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने चीनमधील 'आयफोन सप्लायर' असलेल्या जस्टेक प्रिसिजन या कंपनीची भारतीय युनिट सुमारे १०० मिलियन डॉलरमध्ये (जवळपास ८३० कोटी रुपये) खरेदी केली आहे.
सीएनबीसीच्या एका अहवालानुसार, ही डील अशा वेळी झाली आहे, जेव्हा टाटा इलेक्ट्रॉनिक्स भारतात आयफोन निर्मितीची आपली क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, भारतातून आयफोनची निर्यात विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.
टाटाला काय फायदा होणार?
- जस्टेक प्रिसिजन ही चीनमधील कुनशान शहराची कंपनी आहे आणि ती २००८ पासून ॲपलची सप्लायर म्हणून काम करत आहे. या कंपनीचे भारतीय युनिट २०१९ मध्ये तामिळनाडूमध्ये सुरू झाले होते.
- टाटा इलेक्ट्रॉनिक्सने ऑगस्ट महिन्यात ही खरेदी प्रक्रिया पूर्ण केली. या डीलमुळे टाटाला थेट आयफोन पुरवठा शृंखलेत आपले स्थान आणखी मजबूत करता येणार आहे.
- या खरेदीमुळे टाटा इलेक्ट्रॉनिक्सला आयफोन असेंबलिंग आणि निर्यात क्षमतेत मोठी वाढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण तांत्रिक कौशल्य आणि पायाभूत सुविधा मिळेल.
टाटाची दुसरी मोठी खरेदी
टाटा इलेक्ट्रॉनिक्सने केलेली ही दुसरी मोठी खरेदी आहे. यापूर्वी, जानेवारी २०२५ मध्ये टाटा ग्रुपने पेगाट्रॉनच्या भारतीय ऑपरेशन्समध्ये ६०% हिस्सा १,६५० कोटी रुपयांना खरेदी केला होता. या करारामुळे टाटाला चेन्नईजवळील पेगाट्रॉनचा आयफोन निर्मितीचा कारखाना मिळाला होता.
सध्या टाटा इलेक्ट्रॉनिक्स दोन मोठ्या फॅक्टरीतून आयफोनचे असेंबलिंग आणि निर्यात करत आहे. यामध्ये मार्च २०२४ मध्ये खरेदी केलेल्या विस्ट्रॉनच्या फॅक्टरीचाही समावेश आहे.
वाचा - LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
निर्यात कमाईत मोठी वाढ
टाटा ग्रुप इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आपली क्षमता वाढवत असल्यामुळे त्यांच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये अमेरिकेला पाठवलेल्या आयफोन शिपमेंटमधून टाटा इलेक्ट्रॉनिक्सला २३,११२ कोटी रुपयांचे रेव्हेन्यू (सुमारे ३७%) मिळाले आहेत. या डीलमुळे टाटा इलेक्ट्रॉनिक्सची क्षमता आणि जागतिक बाजारपेठेत ॲपलसाठीचे उत्पादन वाढण्यास मदत होईल.