व्हिडीओ आणि लाइव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी भारतातील ग्राहक केबल कनेक्शनऐवजी डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. अशातच आता टाटा आणि भारती समूह आपल्या तोट्यात चाललेल्या डीटीएच म्हणजेच डायरेक्ट टू होम बिझनेस एअरटेल डिजिटल टीव्ही आणि टाटा प्ले यांचं विलीनीकरण करत आहेत.
भारती समूह आणि टाटा त्यांच्या डीटीएच व्यवसाय, टाटा प्ले आणि एअरटेल डिजिटल टीव्हीच्या विलीनीकरणाला अंतिम रूप देत आहेत. हे विलीनीकरण शेअर स्वॅपच्या माध्यमातून होणार आहे. यामुळे एअरटेलच्या नॉन-मोबाइल महसुलात वाढ होण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय.
एअरटेलचा या जॉइंट व्हेंचरमध्ये ५० टक्क्यांहून अधिक हिस्सा असेल. एअरटेलकडे या नव्या कंपनीत ५० ते ५५ टक्के हिस्सा असेल, तर वॉल्ट डिस्ने आणि टाटा प्लेच्या भागधारकांकडे ४५ ते ४८ टक्के हिस्सा असण्याची शक्यता आहे. यांच्यात अजूनही हिस्सेदारीबाबत बोलणी सुरू आहेत. टाटा समूह संचालक मंडळात दोन जागांची मागणी करत असल्याचे म्हटलं जात आहे. एअरटेलचे वरिष्ठ व्यवस्थापन ही नवी कंपनी चालवू शकते, असंही म्हटलं जात आहे.
टाटा प्ले ची सुरुवात
टाटा प्ले याचं मूळ नाव टाटा स्काय होतं, जी रुपर्ड मर्डोक यांच्या न्यूज कॉर्पच्या संयुक्त उपक्रमात सुरू झाली. त्यानंतर २०१९ मध्ये वर्ल्ड डिस्ने कंपनीनं मर्डोक यांच्या फॉक्सचं अधिग्रहण केलं. टाटा प्ले आणि एअरटेल डिजिटल टीव्हीचे विलीनीकरण ट्रिपल प्ले धोरणानुसार आहे. यामुळे टेलिकॉम, ब्रॉडबँड आणि डीटीएच सेवा एकत्र जोडल्या जात आहेत. या विलीनीकरणानंतर एअरटेल टाटा प्ले १९ मिलियन घरांपर्यंत पोहोचेल.
दुसरं मोठं मर्जर
२०१६ मध्ये डिश टीव्ही आणि व्हिडिओकॉन डी२एच च्या विलीनीकरणानंतर सुमारे दशकभरातील हा दुसरा सर्वात मोठा विलीनीकरण करार असणार आहे. यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्ने यांच्यात विलीनीकरणाचा करार झाला होता, ज्यात स्टार इंडिया आणि वायकॉम १८ चे विलीनीकरण करून जिओ स्टारची निर्मिती करण्यात आली होती.