Trump Tariffs on Pharmaceuticals: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी (२५ सप्टेंबर) एक मोठी घोषणा केली. या घोषणेमुळे औषध निर्माण कंपन्यांना झटका बसला आहे. अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व कंपन्यांच्या औषधांवर १०० टक्के टॅरिफ लावत असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले. १ ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, अमेरिकेत औषध निर्माण कारखाने सुरू करणाऱ्या कंपन्यांनाच यातून वगळण्यात येणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून औषधांवरही टॅरिफ लावण्याचे संकेत दिले जात होते. गुरुवारी त्यांनी घोषणा करून टाकली. या निर्णयामुळे भारतीय कंपन्यांचे टेन्शन वाढले आहे. भारतीय औषध कंपन्यांसाठी अमेरिका एक मोठी बाजारपेठ आहे.
औषधांवर १०० टक्के टॅरिफ
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ सोशल या मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहून याची घोषणा केली.
ट्रम्प म्हणाले, "१ ऑक्टोबर २०२५ पासून कोणत्याही ब्रॅण्डेड किंवा पेटेंट औषधांवर १०० टक्के टॅरिफ लावणार आहे."
कोणत्या कंपन्यांना यातून वगळणार?
ट्रम्प यांनी पुढे असेही म्हटले आहे की, "जोपर्यंत औषधी विकणारी कंपनी अमेरिकेत स्वतःचा कारखाना सुरू करत नाही, तोपर्यंत टॅरिफ आकारला जाणार. कंपनीच्या प्लँटची उभारणी सुरू झालेली असेल म्हणजे बांधकाम सुरू आहे असे समजले जाईल. जर काम सुरू झालेले असेल, तर त्या औषधी निर्माण कंपन्यांच्या उत्पादनांवर (औषधी) कोणताही टॅरिफ असणार नाही. या मुद्द्याकडे लक्ष दिल्याबद्दल तुमचे आभार", असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
भारतीय औषध कंपन्यांना फटका
भारतीय औषध निर्माण कंपन्यांसाठी अमेरिका एक मोठी बाजारपेठ आहे. फॉर्मास्युटिकल एक्सप्रोर्ट प्रमोशन काऊन्सिल ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारतातून २७.९ बिलियन डॉलर इतकी म्हणजेच ८.७ बिलियन डॉलरपेक्षा जास्त औषधी निर्यात केली गेली. त्यापैकी ३१ टक्के औषधी ही फक्त एकट्या अमेरिकेमध्ये निर्यात केली गेली.
अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या ४५ टक्क्यांपेक्षा जास्त जेनेरिक आणि १५ टक्के बायोसिमिलर औषधींची निर्यात करतो. डॉ. रेड्डीज, अरबिंदो फार्मा, जायडस लाईफ सायन्सेस, सन फार्मा आणि ग्लँड फार्मा सारख्या कंपन्यांच्या एकूण कमाईपैकी ३० ते ३५ टक्के कमाई अमेरिकेतून येते.
ट्रक, फर्निचरहीवर टॅरिफ
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये आयात केल्या जाणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या ट्रकच्या आयातीवरही २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. परदेशी ट्रक निर्माता कंपन्या अमेरिकेतली कंपन्यांचं नुकसान करत आहेत. पीटरबिल्ट, केनवर्थ, फ्रेटलाईनर, मॅक ट्रक्स या कंपन्यांचे परदेशी कंपन्यांपासून संरक्षण केलं जाईल, असेही ते म्हणाले.
परदेशी कंपन्यांमुळे अमेरिकेतील स्थानिक कंपन्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे फर्निचर आणि किचन कॅबिनेटवरही ५० टक्के टॅरिफ आकारला जाणार, अशी घोषणाही त्यांनी केली. त्यांच्या निर्णयामुळे घराचे फर्निचर करणे अमेरिकेतील नागरिकांसाठी महाग होणार आहे.