Zomato Swiggy Strike News: नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारी दरम्यान फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स क्षेत्रात मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. देशभरातील गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सनी आपल्या मागण्यांसाठी आज संपावर जाण्याची घोषणा केली होती. मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, हा संप लक्षात घेता आता स्विगी आणि झोमॅटो या कंपन्यांनी पीक आवर्स आणि वर्षाच्या शेवटच्या दिवसांत जास्त इन्सेंटिव्ह देण्याची घोषणा केली आहे. डिलिव्हरी वर्कर्स वेतनातील पारदर्शकता, कामाच्या चांगल्या अटी आणि १० मिनिटांत डिलिव्हरी देण्याच्या पद्धतीला विरोध म्हणून संप करत आहेत. २५ डिसेंबर रोजी देखील डिलिव्हरी पार्टनर्सनी संप केला होता. दुसरीकडे, डिलिव्हरी वर्कर्स युनियन्सचे म्हणणं आहे की, हे केवळ तात्पुरतं 'बँड-एड' लावण्यासारखं काम आहे. कंपन्यांना केवळ पीक आवर्सची समस्या सोडवायची आहे, तर कामगारांची मागणी कायमस्वरूपी वेतन रचना आणि सुरक्षिततेशी संबंधित आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
युनियन्सनी आपलं आवाहन सुरूच ठेवलं असून रायडर्सना या 'एका दिवसाच्या लालसे'ला बळी न पडता भविष्यातील सुरक्षिततेसाठी संप सुरू ठेवण्याचं आवाहन केलंय. कंपन्यांसाठी न्यू इयर इव्ह हा वर्षातील सर्वात व्यस्त आणि नफ्याचा काळ असतो, जेव्हा ऑर्डर्सची संख्या सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटींनी वाढते. याच गोंधळाच्या दरम्यान, कंपन्यांनी रायडर्सना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून त्यांनी संप सोडून रस्त्यावर उतरावं आणि ग्राहकांपर्यंत अन्नपदार्थ पोहोचवावे.
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
झोमॅटोने वाढवले इन्सेंटिव्ह
झोमॅटोने आपल्या डिलिव्हरी पार्टनर्सना कळवलं आहे की, न्यू इयर इव्हला संध्याकाळी ६ ते रात्री १२ या 'क्रिटिकल' पीक आवर्समध्ये प्रति ऑर्डर १२० ते १५० रुपयांपर्यंत रक्कम दिली जाऊ शकते. हे सामान्य दिवसांच्या तुलनेत खूप जास्त आहे. याशिवाय, झोमॅटोनं कामगारांना आश्वासन दिलंय की, जर ते दिवसभर उपलब्ध राहिले आणि ऑर्डरचे प्रमाण जास्त राहिले, तर ते एका दिवसात ३,००० रुपयांपर्यंत कमाई करू शकतात. झोमॅटोनं 'पेनल्टी माफी'ची देखील घोषणा केली आहे. सहसा ऑर्डर नाकारल्यास किंवा रद्द झाल्यास रायडर्सना दंड भरावा लागतो, परंतु नवीन वर्षाच्या निमित्तानं हा दंड तात्पुरता माफ करण्यात आला आहे. यामुळे रायडर्सच्या मनातील उत्पन्नाच्या नुकसानीची भीती कमी होईल आणि ते कोणत्याही दबावाशिवाय काम करू शकतील.
स्विगीची 'मेगा अर्निग' ऑफर
स्विगीनं देखील ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीसाठी एक मोठी 'मेगा-अर्निग' ऑफर काढली आहे. कंपनीनं आपल्या डिलिव्हरी पार्टनर्सना पाठवलेल्या संदेशांमध्ये असा दावा केला आहे की, या दोन दिवसांच्या कालावधीत ते एकूण १०,००० रुपयांपर्यंत मोठी कमाई करू शकतात. विशेषतः ३१ डिसेंबरच्या संध्याकाळसाठी (सायंकाळी ६ ते रात्री १२) स्विगी २,००० रुपयांपर्यंत पीक आवर इन्सेंटिव्ह देत आहे. वर्षातील सर्वात व्यस्त वेळेत पुरेसे रायडर्स उपलब्ध राहतील आणि कोणत्याही ऑर्डरला उशीर होणार नाही याची खात्री करणं, हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे.
झेप्टोच्या पेआउटमध्येही वाढ
केवळ फूड डिलिव्हरीच नाही तर क्विक कॉमर्स क्षेत्रातही इन्सेंटिव्ह दिले जात आहेत. झेप्टोनंदेखील आपल्या डिलिव्हरी पार्टनर्ससाठी पेमेंट स्ट्रक्चरमध्ये सुधारणा केली आहे. नवीन वर्षात किराणा माल, पार्टी साहित्य आणि कोल्ड ड्रिंक्सला मोठी मागणी असते, त्यामुळे झेप्टो कोणत्याही प्रकारचा अडथळा सहन करण्याच्या स्थितीत नाही. उद्योगातील सूत्रांनुसार, स्विगी, झोमॅटो आणि झेप्टो या तिन्ही कंपन्या सध्या 'डबल फ्रंट'वर लढत आहेत - एकीकडे वाढलेली मागणी पूर्ण करणं आणि दुसरीकडे संपाचा परिणाम कमी करणे.
इन्सेंटिव्ह वाढवण्याचा निर्णय का घेतला?
या निर्णयामागे २५ डिसेंबरच्या संपाचा अनुभव दडला आहे. ख्रिसमसच्या दिवशी दिल्ली-NCR सह अनेक भागांत डिलिव्हरी सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली होती, ज्यामुळे कंपन्यांना स्थानिक पातळीवर नुकसान सहन करावं लागलं होतं.
