चंद्रकांत दडस, उपसंपादक -
रोजगारी हा कोणाच्याही आयुष्यात कधीही येऊ शकणारा धक्का असतो. अचानक नोकरी गेल्यास मानसिक आणि आर्थिक दोन्ही पातळ्यांवर तणाव निर्माण होतो. मात्र, योग्य नियोजन करून या कठीण परिस्थितीचा सामना करता येईल. या संकटात नेमके काय करावे हे जाणून घेऊ...
नोकरी गेल्यावर सर्वप्रथम घाबरण्याची किंवा नकारात्मक विचार करण्याची अजिबात गरज नाही. शांतपणे विचार करून पुढील नियोजन करा. सर्वप्रथम तुमच्याकडे किती पैसे शिल्लक आहेत?. तुम्ही तयार केलेला इमर्जन्सी फंड किती काळ पुरेल?, घरखर्च किती आहे आणि तो किती कमी करता येईल? कोणती कर्जे बाकी आहेत? याचा आढावा घ्या आणि नियोजन करा.
बेरोजगारीच्या काळात गरजेचे आणि ऐच्छिक खर्च वेगळे करा. घरभाडे, गृहकर्जाचा हप्ता, अन्नधान्य, वीज-पाणी बिल, मुलांचे शिक्षण यासाठीच रक्कम खर्च करा, तर महागडे ब्रँडेड कपडे, बाहेरून जेवण, सबस्क्रिप्शन सेवा, लक्झरी वस्तू यांचा मोह टाळा. इमर्जन्सी फंड कमी असेल, तर उपलब्ध बचत योग्य ठिकाणी खर्च करण्याचे ठरवा.
जर गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे बिल असेल, तर बँकेशी संपर्क साधा आणि हप्त्यांमध्ये दिलासा मिळू शकतो का, याची माहिती घ्या. क्रेडिट कार्डच्या मोठ्या देयकांऐवजी मिनिमम पेमेंट करण्याचा विचार करा. शक्य असल्यास काही मालमत्ता विकून कर्जाचा भार कमी करण्याचा विचार करा.
उत्पन्नाच्या संधी शोधा
नवीन नोकरी मिळेपर्यंत काही पर्यायी उत्पन्नाच्या संधी शोधा. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असेल (स्वयंपाक, कला, शिकवणी) तर ते सुरू करा. बेरोजगारीचा काळ हा आत्मपरीक्षण आणि नवीन कौशल्य शिकण्यासाठी उत्तम असतो.
तुमच्या पूर्वीच्या संपर्कांचा उपयोग करून नवीन नोकरीसाठी शोध सुरू करा. लक्षात घ्या नोकरी करताना उत्पन्नाचा दुसरा स्रोत ठेवा. तो तुम्हाला अशा संकटात मदतीला येईल.