Success Story: त्या हिरव्या ट्युबमधील क्रीम, जी बहुतांश घरात तुम्हाला सापडेल.जखम झाल्यावर, हाताला भाजल्यावर, त्वचेला जळजळ झाल्यावर किंवा टाचांना भेगा पडल्यावर सर्वात आधी आठवते. होय, आम्ही बोरोलीनबद्दल बोलत आहोत. जवळपास ९५ वर्षे जुनी असलेली ही क्रीम स्वातंत्र्यापूर्वीची आहे, जेव्हा येथे ब्रिटिशांचं राज्य होतं. तरीही आजही ती प्रत्येक घराचा अविभाज्य भाग आहे. एका छोट्याशा क्रीमनं इतका मोठा प्रवास केला, हे ऐकून छान वाटते ना?
बोरोलीनची सुरुवात आणि स्वदेशी चळवळ
बोरोलीनची सुरुवात १९२९ मध्ये कोलकाता येथील एक श्रीमंत व्यापारी गौरमोहन दत्ता यांनी केली. ते सुरुवातीला परदेशी औषधं आयात करत असत, पण स्वदेशी आंदोलनानं प्रेरित होऊन त्यांनी जीडी फार्मास्यूटिकल्स कंपनी सुरू केली. त्यांचा उद्देश होता की, आयात केलेल्या वस्तूंइतकीच चांगली, पण प्रत्येक भारतीयाच्या खिशाला परवडेल अशी औषधं बनवणं. बोरोलीन हे बोरिक ॲसिड, लॅनोलिन आणि झिंक ऑक्साईड मिसळून तयार करण्यात आले. ही क्रीम खोलवरच्या जखमा, फोड आणि त्वचेच्या प्रत्येक समस्येवर एकच उपाय होती.
ब्रिटीशांनी उत्पादन थांबवण्याचे केले प्रयत्न
जेव्हा बोरोलीन बाजारात आणली गेली, तेव्हा ब्रिटिशांनी तिचे उत्पादन थांबवण्याचे खूप प्रयत्न केले, पण ते अयशस्वी ठरले. हळूहळू ही क्रीम प्रत्येक घरात पोहोचली. काश्मीरमध्ये थंडीमुळे फाटलेली त्वचा बरी करण्यासाठी असो किंवा कन्याकुमारीत तीव्र उन्हापासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी, प्रत्येक ठिकाणी तिचा वापर होऊ लागला. ती प्रत्येक वयोगटासाठी आणि प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी परिपूर्ण ठरली.
कंपनीचा विस्तार आणि उत्पादन श्रेणी
कंपनीची लोकप्रियता वाढत गेली. पहिला कारखाना पश्चिम बंगालच्या चकबागी येथे २० एकर जमिनीवर उभारला गेला आणि दुसरा कारखाना गाझियाबादच्या मोहननगर येथे उभारण्यात आला. बोरोलीन व्यतिरिक्त आता कंपनी सुथोल (ॲन्टिसेप्टिक लिक्विड, जे उन्हाळ्यात उपयोगी पडते), एलेन हेअर ऑईल, ग्लोसॉफ्ट फेस वॉश, पेनऑर्ब लिक्विड पेन रिलीव्हर यांसारखी उत्पादनं बनवते. उन्हाळ्यात सुथोलची विक्री जास्त होते, तर हिवाळ्यात बोरोलीनची.
बोरोलीन हे नाव दोन शब्दांतून आले आहे – 'बोरो' हे बोरिक पावडरमधून आणि 'ओलीन' हे लॅटिनमधील 'ओलियन'मधून आलं आहे आणि तिचा लोगो हत्तीचा आहे, जो शुभ आणि स्थिरतेचं प्रतीक आहे.
केवळ क्रीम नाही, तर वारसा
इतकंच नाही, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते सुपरस्टार कलाकारांपर्यंत अनेक जण तिचा वापर करत होते. बोरोलीन ही केवळ क्रीम नसून लोकांच्या भावनांशी जोडली गेली आहे. कंपनीची उत्पादनं भारताव्यतिरिक्त ओमान, तुर्की, बांगलादेश आणि यूएई मध्येही नोंदणीकृत आहेत. विचार करा, आज बाजारात इतकी सौंदर्य उत्पादनं उपलब्ध आहेत, तरीही बोरोलीन आपलं स्थान सोडत नाहीये. ती स्वदेशी आंदोलनाचे प्रतीक बनून राहिली, जी आपल्याला आर्थिक आत्मनिर्भरता शिकवते. ही फक्त क्रीम नाही, तर आपल्या वारसाचा एक भाग आहे.