आज, २३ ऑक्टोबर रोजी आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. यामुळे निफ्टी आयटी इंडेक्स ३.१४ टक्क्यांनी उसळून ३६,४०६.०५ च्या पातळीवर पोहोचला. इन्फोसिस (Infosys), एचसीएल टेक्नॉलॉजीज (HCL Technologies) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सारख्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून येत आहे. या शेअर्समध्ये तेजी येण्याचे एक महत्त्वाचं कारण म्हणजे भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार कराराची अपेक्षा हे आहे. निफ्टी आयटी आज सर्वात जास्त वाढलेला सेक्टोरल इंडेक्स ठरला आहे. त्यानं एका महिन्यापेक्षा जास्त कालावधीत प्रथमच ३६,००० चा टप्पा पार केला आहे.
इन्फोसिसच्या प्रवर्तकांनी बायबॅकपासून अंतर ठेवलं
इन्फोसिसच्या शेअर्समध्ये सुमारे ५% ची तेजी दिसून आली आणि तो ₹१,५४२.८० पर्यंत पोहोचला. ही तेजी यासाठी आली कारण कंपनीचे प्रवर्तक आणि प्रवर्तक ग्रुप, ज्यात नंदन नीलेकणी आणि सुधा मूर्ती यांचा समावेश आहे, त्यांनी कंपनीच्या ₹१८,००० कोटींच्या शेअर बायबॅक मध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला. तज्ज्ञांच्या मते, प्रवर्तकांचे हे पाऊल कंपनीच्या भविष्यावर त्यांचा विश्वास दर्शवतं. तसंच, यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी बायबॅकमध्ये भाग घेण्याची शक्यता वाढेल.
आयटी क्षेत्राचे निकाल
इन्फोसिससोबतच एचसीएल टेक (HCLTech), एमफॅसिस (Mphasis), परसिस्टेंट सिस्टिम्स (Persistent Systems), टीसीएस (TCS), टेक महिंद्रा (Tech Mahindra), विप्रो (Wipro), कॉफोर्ज (Coforge) आणि एलटीआयमाइंडट्रीच्या (LTIMindtree) शेअर्समध्ये देखील २-३% पर्यंत तेजी नोंदवली गेली. एचसीएल टेकनं आपल्या FY26 साठी रेव्हेन्यू ग्रोथ गायडन्स ३-५% वर कायम ठेवलं आहे. कंपनीनं आपल्या सर्व्हिसेस सेगमेंटचे ग्रोथ गायडन्स ४-५% पर्यंत वाढवले आहे, जे देशातील टॉप ५ आयटी कंपन्यांमध्ये सर्वाधिक आहे.
भारत-अमेरिका व्यापार कराराची अपेक्षा
भारत आणि अमेरिकेदरम्यान नवीन व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. अहवालानुसार, यात भारतीय निर्यातीवर लागणारा अमेरिकेचा कर ५०% वरून कमी करून १५-१६% पर्यंत केला जाऊ शकतो. या बदल्यात, भारत रशियाकडून तेलाची आयात कमी करण्यास आणि अमेरिकेच्या नॉन-जीएम कॉर्न व सोयामिलला आपल्या बाजारात स्थान देण्यास सहमत होऊ शकतो. चांगल्या संबंधांमुळे नवीन करार आणि व्यवसायाच्या संधी वाढू शकतात. याव्यतिरिक्त, अमेरिकेच्या प्रशासनाने स्पष्ट केलंय की एच-१बी व्हिसावर अमेरिकेत आधीच असलेल्या आंतरराष्ट्रीय पदवीधरांवर नवीन शुल्क लागू होणार नाही. तसेच, जुने एच-१बी व्हिसा धारकदेखील या शुल्कातून मुक्त राहतील.
अमेरिकेकडून चीनवर सॉफ्टवेअर निर्यातीला थांबवण्याची तयारी
अहवालानुसार, अमेरिका चीनला सॉफ्टवेअर निर्यात थांबवण्याची योजना आखत आहे. यात लॅपटॉपपासून जेट इंजिनपर्यंत अनेक उत्पादने समाविष्ट असतील. असं झाल्यास, भारतीय आयटी कंपन्या याच्या पुरवठादार बनून फायदा घेऊ शकतात, कारण अमेरिकन कंपन्या काही प्रकल्प भारताकडे हस्तांतरित करू शकतात.
फेड रेट कपातीमुळे तेजी वाढली
आयटी शेअर्समध्ये तेजी येण्याचं आणखी एक कारण म्हणजे - अमेरिकेच्या केंद्रीय बँकेद्वारे (US Fed) व्याजदर कमी करण्याची अपेक्षा. पुढील बैठकीत एक चतुर्थांश टक्क्यानं कपात करून दर ३.७५-४% पर्यंत आणला जाऊ शकतो. कमी व्याजदरामुळे अमेरिकेत खर्च वाढेल, ज्यामुळे आयटी सेवांची मागणीही वाढण्याची शक्यता आहे.
(टीप - यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)