Stock Market Today: शेअर बाजारात आज सपाट ओपनिंग पाहायला मिळाली. सेन्सेक्स १११ अंकांनी वधारून ८०,९०७ वर उघडला. निफ्टी ३९ अंकांनी वधारून २४,५०० वर पोहोचला. मात्र यानंतर त्यात घसरण झाली. बँक निफ्टी १ अंकांनी वधारून ५४,९१८ वर पोहोचला. तर, रुपया ८४.२५ च्या तुलनेत ८४.२८/डॉलरवर उघडला. आज सुरुवातीच्या व्यवहारात फार्मा आणि रियल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्री झाली. तर निफ्टी ऑटो आणि मेटल इंडेक्सचे शेअर्स तेजीसह व्यवहार करताना दिसले.
कामकाजादरम्यान महिंद्रा अँड महिंद्रा, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, बजाज फिनसर्व्ह आणि हिंदुस्तान युनिलिव्हरच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. तर अल्ट्राटेक, रिलायन्स, इटर्नल, टाटा मोटर्स, सनफार्मा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मात्र घसरण दिसून आली.
भारतीय शेअर बाजारावरील गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा उंचावताना दिसत आहे. दोन वर्षांत पहिल्यांदाच एफआयआय आणि डीआयआय या दोघांनीही सलग सहाव्या दिवशी एकत्र खरेदी केली. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) काल सलग तेराव्या दिवशी रोख बाजारात ३८०० कोटी रुपयांहून अधिकची निव्वळ खरेदी केली. त्याचबरोबर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनीही (डीआयआय) २८०० कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली, ज्याला बाजारात मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला.
अमेरिकेच्या बाजाराला काल ब्रेक
आंतरराष्ट्रीय बाजारांबद्दल बोलायचं झालं तर अमेरिकेच्या शेअर बाजाराला नऊ दिवसांच्या तेजीनंतर काल ब्रेक लागला. डाऊ जोन्स ४०० अंकांच्या चढ-उतारानंतर १०० अंकांनी घसरला, तर नॅसडॅक १२५ अंकांनी घसरून बंद झाला. याउलट आज सकाळी गिफ्ट निफ्टी सुमारे ५० अंकांनी वधारून २४६०० वर पोहोचला. गुंतवणूकदारांचं लक्ष आता आजपासून सुरू होणाऱ्या अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या एफओएमसी बैठकीकडे लागलं आहे. या बैठकीत दरांबाबत मोठा संकेत मिळण्याची शक्यता आहे. जपानमधील शेअर बाजार अजूनही बंद असल्यानं आशियाई संकेत मर्यादित आहेत.