Stock Market Today: शेअर बाजाराची किरकोळ घसरणीसह सुरुवात झाली. तर बाजार उघडताच सेन्सेक्स ५५ अंकांनी घसरून ८३,३८७ वर आला. हीच परिस्थिती निफ्टी आणि बँक निफ्टीची होती. निफ्टी ३४ अंकांच्या घसरणीसह २५,४२७ वर उघडला. बँक निफ्टी ७ अंकांनी घसरून ५६,९४२ वर उघडला. रुपया ८५.८५ च्या तुलनेत ८५.७५/डॉलरवर उघडला. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर एफएमसीजी आणि फार्मा सेक्टरमध्ये आज सुरुवातीच्या व्यवहारात विक्री दिसून आली. मात्र, त्याशिवाय उर्वरित क्षेत्रे किरकोळ वाढीसह ग्रीन झोनमध्ये व्यवहार करताना दिसली.
कामकाजादरम्यान कोटक बँक, इटर्नल, टाटा मोटर्स, बीईएल आणि अदानी पोर्ट्स यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसली. तर महिंद्रा अँड महिंद्रा, भारती एअरटेल, एचसीएलटेक, सनफार्मा आणि टायटन या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
या बातमीमुळे बाजारावर दबाव आहे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक व्यापारावर मोठा परिणाम करणारं वक्तव्य केलंय. ट्रम्प यांनी १४ देशांवर २५ ते ४० टक्क्यांपर्यंत प्रचंड शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. यामध्ये जपान, दक्षिण कोरिया, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे. हे दर १ ऑगस्टपासून लागू होतील. ट्रम्प यांच्या या धोरणाचा थेट परिणाम अमेरिकेत या देशांमधून येणाऱ्या उत्पादनांवर होणार आहे.
भारताकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन
ट्रम्प यांनी इतर देशांबाबत आक्रमक भूमिका घेतली असली तरी भारताकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन तुलनेनं सकारात्मक आहे. ट्रम्प म्हणाले की, अमेरिका भारतासोबत व्यापार कराराच्या अगदी जवळ आहे. या विधानाकडे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांसाठी चांगले संकेत म्हणून पाहिले जात आहे.
ब्रिक्स धोरणावर कडक इशारा
ब्रिक्स गटाच्या अमेरिकाविरोधी धोरणावरही ट्रम्प यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जर एखाद्या देशानं अमेरिकाविरोधी धोरण अवलंबलं तर त्यावर १० टक्के अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं. ब्रिक्स देश अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करत असताना हे विधान करण्यात आले आहे.