Share Market Today : भारतीय शेअर बाजारात सलग चार दिवसांच्या तेजीनंतर आज, ८ ऑक्टोबर रोजी जोरदार नफावसुली पाहायला मिळाली. यामुळे सेन्सेक्स सुमारे १५३ अंकांनी घसरून बंद झाला, तर निफ्टी २५,१०० च्या खाली आला. दिवसभरात बाजारात चढ-उतार दिसून आले. परंतु, दुपारनंतर आलेल्या विक्रीच्या दबावामुळे बाजाराने सकाळची सर्व वाढ गमावली. सेन्सेक्स दिवसभरातील उच्चांकावरून जवळपास ५०० अंकांनी घसरला.
बीएसई मिडकैप इंडेक्समध्ये ०.७% आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये ०.४% ची घसरण नोंदवली गेली. या घसरणीमुळे, बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २.३५ लाख कोटींनी घटले.
सेक्टोरल कामगिरी आणि सर्वाधिक वधारलेले/घसरलेले समभाग
आजच्या व्यवहारात बाजार पूर्णपणे कमजोर राहिला. केवळ दोनच क्षेत्रांनी काहीशी वाढ नोंदवली, तर उर्वरित क्षेत्रांत जोरदार विक्री दिसून आली.
तेजी असलेले सेक्टर्स
आजच्या व्यवहारात केवळ माहिती तंत्रज्ञान (१.५%) आणि कंझ्युमर ड्युरेबल्स (०.७%) हेच दोन सेक्टर तेजीसह बंद झाले. टीसीएस, इन्फोसिस आणि एचसीएल टेकसारख्या आयटी कंपन्यांमध्ये झालेली खरेदी हे याचे मुख्य कारण होते.
घसरण झालेले सेक्टर्
रिअल्टी, टेलिकॉम, फार्मा, ऑईल ॲण्ड गॅस, मीडिया, पीएसयू बँक आणि ऑटो यांसारख्या प्रमुख सेक्टोरल इंडेक्समध्ये ०.३% ते २% पर्यंत घसरण नोंदवली गेली.
सर्वाधिक तेजी असलेले सेन्सेक्स समभाग | वाढ (टक्के) |
टायटन | ४.३८% |
इन्फोसिस | २.६७% |
टीसीएस | २.५१% |
एचसीएल टेक | १.९१% |
टेक महिंद्रा | १.१७% |
कुठे झाली सर्वाधिक घसरण?
सर्वाधिक घसरण झालेले सेन्सेक्स समभाग | घसरण (टक्के) |
टाटा मोटर्स | २.४१% |
महिंद्रा ॲण्ड महिंद्रा | १.९१% |
भारत इलेक्ट्रॉनिक्स | १.७२% |
अल्ट्राटेक सिमेंट | १.६५% |
ट्रेन्ट | १.४६% |
शेअर बाजाराचा दृष्टिकोन
आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर एकूण ४,३३० समभागांमध्ये व्यवहार झाला. यापैकी २,४३५ समभाग घसरणीसह बंद झाले, तर केवळ १,७४० समभाग तेजीत राहिले. याशिवाय, १६१ समभागांनी आज आपला नवा ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर १४४ समभाग ५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचले. गुंतवणूकदारांनी केलेली नफावसुली आणि बाजारातील उच्च मूल्यांकनामुळे झालेल्या विक्रीमुळे आज बाजाराला ब्रेक लागला.