Stock Market Today: शेअर बाजारात आज सुरुवातीच्या व्यवहारात विक्री दिसून आली. भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर बाजारात रेड झोनमध्ये व्यवहार सुरू झाला. सेन्सेक्स ६९३ अंकांनी घसरून ७९,९४८ वर खुला झाला. निफ्टी १४६ अंकांनी घसरून २४,२३३ वर उघडला. बँक निफ्टी २५८ अंकांनी घसरून ५४,०१३ वर खुला झाला. सकाळी सर्वच निर्देशांक रेड झोनमध्ये व्यवहार करताना दिसले.
मात्र, बाजार उघडल्यानंतर काही वेळातच स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये जबरदस्त रिकव्हरी पाहायला मिळाली. लार्ज कॅप शेअर्समधील खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये आले. सकाळी रेड झोनमध्ये असलेले ऑटो आणि बँकिंग निर्देशांक आता ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत आहेत.
या शेअर्समध्ये तेजी/घसरण
कामकाजादरम्यान टाटा मोटर्स, पॉवरग्रिड, इंडसइंड बँक, एसबीआय बँक, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, टायटन, सनफार्मा, एशियन पेंट्स, एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
ब्रिटनसोबत करार
भारत आणि युनायटेड किंग्डम (यूके) यांच्यातील प्रस्तावित मुक्त व्यापार करारामुळे (एफटीए) दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध बदलणार आहेत. २०३० पर्यंत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार ६,००० कोटी डॉलरवरून १२,००० कोटी डॉलरपर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. या करारानुसार भारताच्या ९९ टक्के निर्यातीवर ब्रिटनमध्ये शुल्क आकारलं जाणार नाही, तर ब्रिटनमधून येणाऱ्या ९० टक्के आयातीवरील शुल्कही भारत कमी करणार आहे. विशेषत: ऑटोमोबाइल क्षेत्राला दिलासा मिळणार आहे, कारण ब्रिटनमध्ये भारतीय वाहनांवरील शुल्क १००% वरून १०% पर्यंत कमी केले जाईल. याशिवाय भारतात व्हिस्की आणि जिन सारख्या प्रीमियम ड्रिंकवरील ड्युटी सध्याच्या १५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांवर आणलं जाणार आहे, जे पुढील १० वर्षांत आणखी कमी करून केवळ ४० टक्के करण्यात येईल.