Stock Market Today: काल शेअर बाजारामध्ये झालेल्या प्रचंड घसरणीनंतर, शुक्रवारी बाजाराची सुरुवात हलक्या तेजीसह झाली आहे. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स १५० अंकांच्या वाढीसह ८४,३३७ च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी ४५ अंकांनी वधारून २५,९२२ वर होता. बँक निफ्टीमध्ये मात्र फ्लॅट व्यवहार पाहायला मिळत होते.
निफ्टी ५० वर ONGC, BEL, Asian Paint, Power Grid, HCL Tech, Eternal आणि Tech Mahindra यांच्या शेअर्समध्ये चांगली तेजी होती. दुसरीकडे, Adani Enterprises, Adani Ports, ICICI Bank, Shriram Finance, NTPC, TMPV आणि Max Health या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. आयटी, पीएसयू बँक, ऑईल अँड गॅस इंडेक्समध्ये किंचित वाढ होती, तर रिअल्टी, मीडिया, हेल्थकेअर आणि एनबीएफसी सारख्या इंडेक्समध्ये विक्रीचा दबाव जास्त होता.
बाजार उघडतानाची स्थिती
मागच्या क्लोजिंगच्या तुलनेत पाहिलं तर, सेन्सेक्स १५८ अंकांनी खाली ८४,०२२ वर उघडला. निफ्टी ३६ अंकांनी खाली २५,८४० वर आणि बँक निफ्टी १२८ अंकांनी खाली ५९,५५८ वर उघडला. चलन बाजारामध्ये मात्र मजबूती दिसून आली. रुपया १५ पैशांनी मजबूत होऊन ८९.९०/डॉलर्सवर उघडला. विदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री, अमेरिकन बाजारातील मिश्र संकेत, कमोडिटीमधील चढ-उतार आणि आजपासून सुरू होणारा 'Bharat Coking Coal IPO' तसंच निकालांच्या हंगामावर बाजाराची विशेष नजर असेल.
जागतिक बाजारातील संकेत
अमेरिकन बाजारातून मिळालेले संकेत संमिश्र होते. डाओ जोन्सने दिवसाच्या खालच्या पातळीवरून जोरदार रिकव्हरी करत ४७५ अंकांच्या उडीनंतर सुमारे २७० अंकांच्या मजबुतीसह बंद झाला. तर नॅस्डॅकमध्ये सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर सुमारे १०० अंकांची घसरण पाहायला मिळाली. गिफ्ट निफ्टी २६,००० च्या आसपास फ्लॅट व्यवहार करत आहे, ज्यामुळे देशांतर्गत बाजार एका मर्यादित कक्षेत उघडण्याचे संकेत मिळाले होते. अमेरिकेतील 'ट्रम्प टॅरिफ' प्रकरणाची सुनावणी आणि डिसेंबरच्या रोजगाराच्या आकडेवारीपूर्वी डाओ फ्युचर्स देखील सुस्त दिसत आहेत.
अमेरिकेत आज काय घडणार?
अमेरिकन सुप्रीम कोर्ट आज ट्रम्प यांच्या टॅरिफ अधिकारांवर महत्त्वपूर्ण निकाल देऊ शकते, ज्याचा परिणाम जागतिक व्यापार आणि बाजारावर होऊ शकतो. याशिवाय, अमेरिकन खासदारांनी भविष्यात व्हेनेझुएलावर ट्रम्प यांच्याकडून होणाऱ्या कोणत्याही लष्करी कारवाईवर बंदी घालण्याचा प्रस्ताव सिनेटमध्ये मांडला आहे, ज्यामुळे भू-राजकीय आघाडीवर थोडी नरमाई दिसून येत आहे.
