Stock Market Today: आजपासून शेअर बाजारामध्ये जानेवारी सीरिजला सुरुवात झाली असून बाजाराची उघडत सकारात्मक झाली आहे. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स २०० अंकांनी वधारून ट्रेड करत होता, तर निफ्टीमध्येही ८० अंकांची वाढ पाहायला मिळाली. बँक निफ्टी देखील सुमारे १४० अंकांनी वर होता. आजच्या व्यवहारात मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी कायम होती.
निफ्टी ५० निर्देशांकावर जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, बीईएल, टायटन, ॲक्सिस बँक, ट्रेंट आणि एनटीपीसी हे शेअर्स 'टॉप गेनर्स'च्या यादीत होते. तसंच बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, हिंदाल्को, एम अँड एम, विप्रो आणि टाटा कन्झ्युमर यांसारख्या शेअर्समध्येही चांगली वाढ दिसून आली.
बाजाराची सुरुवातीची आकडेवारी आणि रुपयाची स्थिती
बाजाराच्या सुरुवातीच्या आकड्यांनुसार, सेन्सेक्स ११८ अंकांच्या वाढीसह ८४,७९३ वर उघडला. निफ्टी ३३ अंकांनी वधारून २५,९७१ वर, तर बँक निफ्टी २३ अंकांनी वर ५९,१९४ वर उघडला. चलन बाजारात रुपया ५ पैशांनी कमकुवत होऊन ८९.८४ प्रति डॉलरवर उघडला. सुरुवातीला भारतीय बाजारासाठी जागतिक संकेत संमिश्र दिसत होते. गिफ्ट निफ्टी (GIFT Nifty) २६,१२५ च्या आसपास व्यवहार करत होता, तर डाओ फ्युचर्समध्ये सुमारे ५० अंकांची घसरण पाहायला मिळत होती.
अमेरिकन बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण
वॉल स्ट्रीटवर सध्या दबावाचं वातावरण आहे. अमेरिकन बाजार सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाले. डाओ जोन्स सुमारे १०० अंकांनी घसरला, तर नॅस्डॅक मध्येही ५५ अंकांची घसरण नोंदवण्यात आली. वाढते 'बॉण्ड यील्ड्स' आणि जागतिक आर्थिक वाढीबाबतची चिंता यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण आहे, ज्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून येत आहे.
चांदीची ऐतिहासिक झेप
आज कमोडिटी बाजारात चांदीच्या किमतीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. घरगुती बाजारपेठेत चांदी २६,६०० रुपयांच्या जोरदार उसळीसह २ लाख ५१ हजार रुपयांच्या पुढे बंद झाली. जागतिक बाजारपेठेतही चांदीमध्ये मोठी खरेदी दिसून आली, जिथे किंमत ८ टक्क्यांनी वाढून ७६ डॉलर प्रति औंसच्या वर पोहोचली. सोन्याच्या किमतीतही मजबूती दिसून आली असून घरगुती बाजारात सोन्याचे भाव सुमारे १,७०० रुपयांनी वधारले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं ४,३५० डॉलरच्या आसपास स्थिर होते. दुसरीकडे, कच्च्या तेलाच्या किमती सुस्त असून ब्रेंट क्रूड ६१ डॉलर प्रति बॅरलवर टिकून आहे.
