लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मंगळवारी दिवाळीच्या मुहूर्तावर झालेल्या एक तासाच्या विशेष सत्रात शेअर बाजाराने सकारात्मक सुरुवात केली. जागतिक बाजारातील चांगल्या संकेतांच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही निर्देशांक थोड्याशा वाढीसह बंद झाले. विक्रम संवत २०८२ चा हे पहिले सत्र होते.
बीएसई सेन्सेक्स ६२.९७ अंकांनी (०.०७ टक्के) वाढून ८४,४२६.३४ वर बंद झाला. सत्रादरम्यान त्याने ८४,६६५.४४ चा उच्चांक आणि ८४,२८६.४० चा नीचांक गाठला. एनएसई निफ्टी २५.४५ अंकांनी (०.१० टक्के) वाढून २५,८६८.६० वर बंद झाला.
दिवाळी २०२५च्या निमित्ताने मंगळवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज बाजारात विशेष ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सत्र पार पडले. ‘मुहूर्त ट्रेडिंग’ हे दरवर्षीचे पारंपरिक सत्र असून ते अत्यंत शुभ मानले जाते. या सत्राद्वारे नव्या संवतची सुरुवात होते.