Share Market Rise : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवार (१७ नोव्हेंबर) रोजी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. जागतिक बाजारातून मिळालेले सकारात्मक संकेत आणि कंपन्यांचे अपेक्षेपेक्षा चांगले तिमाही निकाल यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्येही जोरदार खरेदी दिसून आली.
शेअर बाजारातील तेजीची ४ प्रमुख कारणे
बँकिंग शेअर्समध्ये ऐतिहासिक तेजी
- बँक निफ्टी सोमवारी एका नव्या विक्रमी स्तरावर पोहोचला! सकाळीच्या सत्रातच तो ०.८% किंवा ४५१ अंकांनी उसळी घेऊन ५८,९६८ च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. बँक निफ्टीमधील सर्व १२ शेअर्स हिरव्या निशाणीवर व्यवहार करत होते.
- RBI चा निर्णय : निर्यात-केंद्रित क्षेत्रांसाठी RBI ने विशेष विंडो उघडल्याच्या बातमीनंतर बँकिंग शेअर्समध्ये ही तेजी आली. या निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा मिळण्याची आणि बँकांनाही फायदा होण्याची अपेक्षा आहे.
- तेजी असलेले शेअर्स: कॅनरा बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांसारख्या शेअर्सनी १.८% ते २.५% पर्यंतची मोठी वाढ नोंदवली.
बिहार निवडणुकीच्या निकालांचा सकारात्मक परिणाम
- बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या युतीला मिळालेल्या जोरदार विजयामुळे शेअर बाजारात स्थिरता आणि धोरणात्मक सातत्य राहण्याची आशा वाढली आहे. ब्रोकरेज कंपन्यांचे मत आहे की, हे निवडणूक निकाल गुंतवणूकदारांच्या भावनांना बळ देतील आणि सरकारला आर्थिक सुधारणा अधिक आत्मविश्वासाने पुढे नेण्याची संधी मिळेल.
- मोतीलाला ओसवाल या ब्रोकरेज फर्मनुसार, हे निकाल अशा वेळी आले आहेत जेव्हा सरकारने नुकतेच अनेक आर्थिक सुधारणा केल्या आहेत आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठी विक्री आधीच केली आहे. त्यामुळे भारतीय बाजारात आता टिकाऊ तेजी येण्याची शक्यता आहे.
अपेक्षेपेक्षा चांगले तिमाही निकाल
- सप्टेंबर तिमाहीतील कंपन्यांचे कॉर्पोरेट निकाल अपेक्षेपेक्षा चांगले राहिले आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या विश्लेषकांनुसार, या तिमाहीत मिड-कॅप कंपन्यांची कामगिरी लार्ज-कॅप आणि स्मॉल-कॅप कंपन्यांपेक्षा सरस ठरली.
- नफा वाढला: जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसच्या म्हणण्यानुसार, कंपन्यांचा निव्वळ नफा गेल्या सहा तिमाहींमध्ये सर्वाधिक म्हणजे १०.८% ने वाढला आहे. विश्लेषकांना आशा आहे की, सणासुदीचा काळ आणि खर्चातील वाढ यामुळे आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या सहामाहीत कमाई आणखी चांगली होईल.
अमेरिकेच्या टॅरिफमध्ये कपात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०० हून अधिक खाद्यपदार्थांवरील टॅरिफ हटवण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे जागतिक बाजाराला काहीसा दिलासा मिळाला आहे. यामुळे वस्तूंच्या आणि खाद्यपदार्थांच्या पुरवठा साखळीवरील दबाव कमी होण्याची अपेक्षा आहे.
वाचा - क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
टेक्निकल चार्ट काय सांगतात?
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ मार्केट स्ट्रॅटेजिस्ट आनंद जेम्स यांच्या मते, निफ्टीमध्ये २६,१३० ते २६,५५० या रेंजमध्ये स्थिरता कायम राहू शकते. मात्र, निफ्टी २६,१३० च्या वर टिकू शकला नाही किंवा २६,८४० च्या खाली घसरला, तर बाजाराचा वेग मंदावू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.
