Stock Market Holiday: भारतीय शेअर बाजार विविध सण आणि मुख्य प्रसंगी बंद असतो. आज ३१ मार्च रोजी देशभरात भगवान महावीर जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्त आज भारतीय शेअर बाजार बंद राहणार आहेत.
महावीर जयंतीनिमित्त बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) दोन्ही सुट्टीमुळे बंद राहतील. सुट्टी असल्यामुळे आज कोणताही व्यापार होणार नाही. इक्विटी (शेअर), इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग (SLB), करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज आणि इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह्ज यांसारखे सर्व विभाग बंद राहतील. कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज विभागातील सकाळचे सत्र बंद राहील, परंतु संध्याकाळच्या सत्रात ट्रेडिंग पुन्हा सुरू होऊ शकते. १ एप्रिल २०२६ रोजी बाजार पुन्हा उघडेल.
या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात ट्रेडिंगसाठी केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. बीएसई आणि एनएसई आज मंगळवार ३१ मार्च रोजी श्री महावीर जयंतीनिमित्त बंद आहेत, त्यानंतर ३ एप्रिल २०२६ रोजी गुड फ्रायडेनिमित्त बाजार बंद राहील. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना या आठवड्यात कमी ट्रेडिंग दिवस मिळतील.
वर्ष २०२६ मधील इतर सुट्ट्या
यावर्षी शेअर बाजारामध्ये अनेक सुट्ट्या आहेत. जसं की, १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाजार बंद राहतील. याशिवाय १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद असेल. तसंच बकरी ईद, गणेश चतुर्थी, गांधी जयंतीनिमित्तदेखील शेअर बाजारात सुट्टी असणार आहे.
गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाच्या गोष्टी
- आज बाजार बंद असल्यामुळे कोणताही नवीन व्यवहार करता येणार नाही.
- उद्या म्हणजेच १ एप्रिल रोजी जेव्हा बाजार उघडेल, तेव्हा मागील दिवसाच्या घसरणीचा परिणाम पाहावा लागेल.
- दीर्घकालीन गुंतवणूकदार घसरणीच्या वेळी चांगले शेअर्स स्वस्त किमतीत खरेदी करण्याची संधी शोधू शकतात.
- या सुट्ट्यांमुळे ट्रेडिंगचे दिवस कमी होतात, त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपली रणनीती आधीच तयार ठेवली पाहिजे.
