Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी आठवड्याची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. सोमवारी १९ जानेवारी रोजी दलाल स्ट्रीटवर विक्रीचा मोठा दबाव पाहायला मिळाला, ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी लोटांगण घातले. कंपन्यांचे कमकुवत तिमाही निकाल, परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री आणि जागतिक बाजारपेठेतील नकारात्मक संकेतांमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह मावळला.
गुंतवणूकदारांना मोठा फटका
बाजारातील या पडझडीमुळे गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत मोठी घट झाली आहे. बीएसईमध्ये सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४६७.८४ लाख कोटींवरून घटून ४६५.३२ लाख कोटी रुपयांवर आले आहे. म्हणजेच, एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे सुमारे १.२२ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.
मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये मोठी पडझड
मोठ्या शेअर्सच्या तुलनेत छोट्या कंपन्यांच्या शेअर्सना विक्रीचा सर्वाधिक तडाखा बसला. बीएसई स्मॉलकॅप इंडेक्स १.२४ टक्क्यांनी कोसळला, तर मिडकॅप इंडेक्समध्ये ०.४३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. निफ्टी ५० मधील ५० पैकी ३० शेअर्स लाल निशाणीत बंद झाले, जे बाजारातील अस्थिरतेचे दर्शन घडवते.
आजचे टॉप गेनर्स आणि लूझर्स (सेंसेक्स)
- तेजीत राहिलेले ५ शेअर्स
- इंडिगो : +३.९७%
- टेक महिंद्रा : +२.८५%
- बजाज फायनान्स : +२.४२%
- हिंदुस्थान युनिलिव्हर : +२.१५%
- कोटक महिंद्रा बँक : +२.०२%
घसरलेले ५ प्रमुख शेअर्स
- रिलायन्स इंडस्ट्रीज : -३.०४%
- आयसीआयसीआय बँक : -२.२६%
- इटर्नल : -१.८५%
- टायटन : -१.६४%
- अदाणी पोर्ट्स : -१.३९%
