Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारासाठी नवीन वर्षाचा पहिला आठवडा अत्यंत वेदनादायी ठरला आहे. जागतिक व्यापार युद्धाची भीती, अमेरिकेतील राजकीय घडामोडी आणि परदेशी गुंतवणूकदारांची तुफान विक्री यामुळे दलाल स्ट्रीटवर सलग पाचव्या दिवशी मंदीचे सावट राहिले. गेल्या पाच सत्रांत बीएसई सेन्सेक्स तब्बल २,१०० हून अधिक अंकांनी कोसळला असून, निफ्टीनेही २५,७०० चा महत्त्वाचा स्तर तोडला आहे. २ जानेवारीला ८५,७६२ वर असलेला सेन्सेक्स आज ८३,५०६ पर्यंत खाली घसरला.
बाजारातील या ऐतिहासिक पडझडीमागे ५ प्रमुख कारणे आहेत.
१. परदेशी गुंतवणूकदारांची मोठी माघार
बाजारातील घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सुरू केलेली विक्रीची लाट. केवळ ८ जानेवारी रोजी एफआयआयने ३,३६७.१२ कोटी रुपयांचे शेअर्स विकून बाजारातून बाहेर पडणे पसंत केले. जागतिक अनिश्चिततेमुळे परदेशी गुंतवणूकदार उदयोन्मुख बाजारपेठांमधून आपली गुंतवणूक काढून घेत आहेत.
२. ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब' आणि रशिया-युक्रेन तणाव
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफविषयक आक्रमक विधानांनी जागतिक बाजार हादरला आहे. रशियाकडून स्वस्त कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर ५०० टक्क्यांपर्यंत दंडात्मक टॅरिफ लावण्याचे संकेत ट्रम्प प्रशासनाने दिले आहेत. या धमकीमुळे भारतीय ऊर्जा क्षेत्र आणि अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे.
३. भारत-अमेरिका व्यापार चर्चेतील अपयश
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चेतून कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही. मार्चपासून चर्चेच्या सहा फेऱ्या होऊनही दोन्ही देश एका निष्कर्षावर पोहोचलेले नाहीत. ट्रम्प प्रशासनाने भारतावर आधीच ५० टक्के टॅरिफ (२५% बेस टॅरिफ + २५% दंड) लादला आहे. भारताने याला अन्यायकारक म्हटले असले तरी, तोडगा निघत नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये कमालीची हताशा आहे.
४. कच्च्या तेलाच्या किमती आणि पुरवठ्याची चिंता
रशियाकडून होणाऱ्या स्वस्त तेल पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने भारताची चिंता वाढली आहे. त्यातच व्हेनेझुएला मधील राजकीय घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता आहे. तेलाच्या किमती वाढल्यास भारताचा चालू खात्यातील तोटा वाढतो आणि महागाई वाढते, ज्याचा थेट फटका शेअर बाजाराला बसतो.
वाचा - 'स्टॉपेज रेशो'ने वाढवली धाकधूक! गुंतवणूकदार म्यॅुच्युअल फंडातून का पडतायत बाहेर?
५. रुपयाची ऐतिहासिक घसरण
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची सुरू असलेली घसरण थांबण्याचे नाव घेत नाहीये. रुपयाने आता ९१ चा स्तर ओलांडला आहे. गेल्या वर्षभरात रुपया ४ टक्क्यांनी कमकुवत झाला असून, रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपानंतरही रुपया सावरताना दिसत नाही. रुपया कमकुवत झाल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय बाजारात गुंतवणूक करणे महाग पडत आहे.
