Stock Market : शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठ्या घसरणीचा 'रेड अलर्ट' (Red Alert) जारी झाला आहे! अमेरिकन शेअर बाजारात बुधवारी रात्री झालेल्या मोठ्या गोंधळाचा थेट परिणाम आज (गुरुवारी) सकाळी भारतीय बाजारांवर दिसून आला. सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर बुधवारी बाजार सावरला होता, पण आज पुन्हा सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) दोन्ही निर्देशांक उघडताच कोसळले.
बाजाराची सुरुवात 'लाल' रंगात
आज सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स रेड झोनमध्ये (घसरणीसह) उघडला आणि काही मिनिटांतच ८०० अंकांनी घसरून ८०,७८६ च्या पातळीवर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील २५० अंकांनी घसरून २४,५४१ वर व्यवहार करत होता. सेन्सेक्स ८१,३२३.०५ वर उघडला, जो त्याच्या मागील बंद ८१,५९६.६३ पेक्षा खाली होता, तर निफ्टी २४,७३३.९५ वर उघडला, जो मागील बंद २४,८१३.४५ पेक्षा कमी होता.
'हे' १० शेअर्स कोसळले, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले
- आजच्या या तीव्र घसरणीत अनेक मोठ्या आणि मिडकॅप कंपन्यांच्या शेअर्सना मोठा फटका बसला.
- लार्ज-कॅप कंपन्या: टेक महिंद्रा (२.५०%), पॉवरग्रिड (२.१४%), एचसीएल टेक (२%) आणि इन्फोसिस (सुमारे २%) यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स घसरले.
- मिडकॅप कंपन्या: ऑइल इंडिया (४%), अशोक लेलँड (२.५०%), डिक्सन (२.४०%), युनो मिंडा (२.३८%) आणि इमामी लिमिटेड (२%) यांचे शेअर्सही तोट्यात होते.
- स्मॉलकॅप: सर्वात मोठी घसरण पारस केबल्सच्या शेअरमध्ये झाली, जो उघडताच तब्बल १० टक्क्यांनी कोसळला.
अमेरिकेतून आले 'घसरणीचे' संकेत
बुधवारी अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे भारतीय बाजारांमध्येही विक्रीचा जोर दिसला. अमेरिकन बाँड उत्पन्नातील वाढ आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर कपात विधेयकाविषयी बाजारातील चिंता, यामुळे अमेरिकन बाजारात हाहाकार माजला होता. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी ८१७ अंकांनी (१.९%) घसरला, तर एस अँड पी ५०० १.६% आणि नॅस्डॅक १.४% ने कोसळला.
वाचा - धक्कादायक आकडेवारी! जगातली निम्मी संपत्ती फक्त १% लोकांकडे, भारताचा नंबर कितवा?
याचा परिणाम आज आशियाई बाजारांवरही दिसून आला. जपानचा निक्केई ३५५ अंकांनी घसरला, तर हाँगकाँगचा हँग सेंग १३१ अंकांनी खाली आला. या जागतिक नकारात्मक संकेतांमुळे भारतीय बाजारालाही आज सुरुवातीला मोठा फटका बसला आहे.