Stock Market : भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरणात बुधवारी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. निफ्टीच्या साप्ताहिक समाप्तीच्या दिवशी बाजारात दबाव दिसून आला. बुधवारी, निफ्टी आणि सेन्सेक्स वरच्या पातळीवरून घसरत बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्री दिसून आली. निफ्टीमधील ५० पैकी ३६ शेअर्स लाल रंगात बंद झाले. जागतिक बाजारात चांगले असतानाही बाजार कोसळल्याने गुंतवणूकदार चिंतेत आहेत.
शेअर बाजार कोणत्या स्तरावर बंद झाला?
बाजाराच्या दोन्ही निर्देशकांमध्ये किरकोळ घसरण पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स ४६ अंकांच्या घसरणीसह ८०,२४२ वर बंद झाला. तर निफ्टी २ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,३३४ वर बंद झाला. निफ्टी बँक ३०४ अंकांच्या घसरणीसह ५५,०८७ वर बंद झाला. निफ्टी मिडकॅप निर्देशांक ४६३ अंकांनी घसरून ५४,१२५ वर बंद झाला.
घसरणीतही 'हे' शेअर्स वधारले
संरक्षण क्षेत्रातील २ दिवसांपासून सुरू असलेली खरेदी आज थांबली. एचएएल ३% आणि बीईएल १% ने बंद झाला. सकारात्मक दृष्टिकोनाच्या आधारावर, टायर स्टॉकमध्ये प्रचंड खरेदी दिसून आली. आज सिएट ९% वाढीसह बंद झाला. रिअल्टी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. मॅक्रोटेक डेव्हलपर्स आणि गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये ३% वाढ झाली.
चौथ्या तिमाहीतील निकाल अपेक्षेपेक्षा कमी आणि कमकुवत गाइडन्सनंतर बजाज फायनान्सचा शेअर ५% ने घसरून बंद झाला. तर प्रीमियममध्ये कपात झाल्यानंतर, बजाज फिनसर्व्ह सुमारे ६% घसरुन बंद झाला. चौथ्या तिमाहीत मजबूत कामगिरीनंतर आज ट्रेंट ४% ने घसरला. काल या शेअरमध्ये चांगली वाढ झाली होती. इंडसइंड बँकेच्या सीईओच्या राजीनाम्यानंतर, आरबीआयने अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली आहे, त्यानंतर शेअर दिवसाच्या नीचांकी पातळीपेक्षा किंचित वर बंद झाला.
वाचा - पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
तेलंगणा युनिटमध्ये आग लागल्याच्या वृत्तानंतर प्रीमियर एक्सप्लोझिव्ह्जचे शेअर १८% ने घसरले. विशाल मेगा मार्ट १०% वाढीसह बंद झाला. कंपनीचा नफा वर्षानुवर्षे ८८% वाढीसह बंद झाला. तर शेफलर इंडियाचा शेअर ६% वाढीसह बंद झाला. वार्षिक आधारावर EBITDA मध्ये १९% वाढ दिसून आली. मार्जिनमध्येही सुधारणा होऊन तो १८.१५% झाला.