Sensex-Nifty Closes Red :भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण जाहीर होण्याच्या एक दिवस आधी, दलाल स्ट्रीटवर आज सावधगिरीचे आणि निराशेचे वातावरण पाहायला मिळाले. सेन्सेक्सच्या वीकली एक्सपायरीमुळे बाजारात प्रचंड चढ-उतार झाले. धातू क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या विक्रीमुळे बाजारावर दबाव वाढला. दिवसअखेर सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी लाल निशाण्यात बंद होणे पसंत केले, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
गुंतवणूकदारांचे २.५२ लाख कोटी पाण्यात
बाजार घसरल्यामुळे बीएसईवर सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठी घट झाली आहे. काल (४ फेब्रुवारी) मार्केट कॅप ४,६९,१६,२०७.२६ कोटी रुपये होते, जे आज कमी होऊन ४,६६,६३,८६८.६७ कोटींवर आले. आज एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २,५२,३३८.५९ कोटींची मोठी घट झाली.
प्रमुख निर्देशांकांची स्थिती
- सेंसेक्स : ५०३.७६ अंकांच्या (०.६०%) घसरणीसह ८३,३१३.९३ वर बंद.
- निफ्टी ५० : १३३.२० अंकांच्या (०.५२%) घसरणीसह २५,६४२.८० वर स्थिरावला.
- क्षेत्रीय कामगिरी : मेटल इंडेक्स १ टक्क्यांहून अधिक तुटला. पीएसयू बँक आणि हेल्थकेअरमध्ये किरकोळ खरेदी झाली. परंतु, ती बाजार सावरण्यासाठी पुरेशी ठरली नाही.
सेंसेक्समधील ३० पैकी केवळ ४ शेअर्स 'हिरवे'
- आजच्या पडझडीत केवळ ४ शेअर्सनी तग धरला, तर उर्वरित २६ शेअर्समध्ये विक्रीचा दबाव राहिला.
- तेजीतील शेअर्स : ट्रेंट, टाटा स्टील, एसबीआय आणि एनटीपीसी.
- घसरणीतील शेअर्स : इटर्नल, एअरटेल आणि बीईएल या शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री झाली.
वाचा - एका चुकीच्या निर्णयाने ९०,००० कोटींचे साम्राज्य बुडाले! वाचा व्हिडिओकॉन समूहाच्या अंताची कहाणी
२,४४७ शेअर्समध्ये घसरण
बीएसईवर आज एकूण ४,३४२ शेअर्समध्ये व्यवहार झाले. त्यापैकी २,४४७ शेअर्स घसरले, तर १,७२७ शेअर्स वधारले. १५८ शेअर्सच्या भावात कोणताही बदल झाला नाही.
