Stock Market : आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजारानेगुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला. अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे सुरुवातीला बाजार दबावात असला, तरी अखेरच्या सत्रात झालेल्या चौफेर खरेदीमुळे बाजार हिरव्या निशाणात बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३१६.५७ अंकांनी (०.३८%) वधारून ८२,८१४.७१ वर स्थिरावला, तर निफ्टी ११६.९० अंकांच्या (०.४६%) वाढीसह २५,५७१.२५ वर बंद झाला.
मेटल आणि पॉवर शेअर्सचा 'पॉवर शो'
आजच्या सत्रात आयटी आणि मीडिया क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रांमध्ये तेजी पाहायला मिळाली. पॉवर, मेटल, कॅपिटल गुड्स आणि सरकारी बँकांच्या निर्देशांकात १ ते २ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.५ टक्क्यांनी वधारला, तर स्मॉलकॅपमध्ये किरकोळ घसरण पाहायला मिळाली.
नफ्यातील आणि तोट्यातील शेअर्स
- नफ्यात : हिंदाल्को इंडस्ट्रीज, एनटीपीसी, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, लार्सन अँड टूब्रो आणि कोल इंडिया.
- तोट्यात : इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि इटरनल.
वाचा - स्विगीचे १० मिनिटांत डिलिव्हरी 'अॅप' बंद! झटपट फूड डिलिव्हरीचा प्रयोग फसला; कर्मचाऱ्यांचे काय होणार?
रुपया ऐतिहासिक नीचांकी स्तरावर
शेअर बाजारात तेजी असली तरी परकीय चलन बाजारात मात्र भारतीय रुपयाची मोठी पडझड झाली आहे. रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ३१ पैशांनी घसरून ९०.९९ (प्रोव्हिजनल) या स्तरावर बंद झाला. व्यवहारादरम्यान रुपयाने ९१.०४ हा निचांकी स्तर गाठला होता. अमेरिका आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरची मजबुती रुपयाला मारक ठरली आहे. तेहरानच्या अणुकार्यक्रमावरील चर्चा फिस्कटल्यास युद्धाचे संकेत दोन्ही देशांनी दिल्याने जागतिक बाजार अस्थिर झाला आहे.
